'प्रिंसेस' सारासाठी बॉलिवूड अभिनेत्याची 'खास' पोस्ट

साराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने.... 

Updated: Aug 13, 2019, 08:54 AM IST
'प्रिंसेस' सारासाठी बॉलिवूड अभिनेत्याची 'खास' पोस्ट  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : बॉलिवूडमध्ये नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यात नवाब असणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याच्या मुलीचा म्हणजेच सारा अली खान हिचा वाढदिवस नुकताच पार पडला. कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर फार कमी वेळात आपला चाहता वर्ग निर्माण करणाऱ्या साराने प्रेक्षकांच्या मनावर चांगलंच अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. अशा या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनीच शुभेच्छा दिल्या. 

सेलिब्रिटी मंडळी आणि चाहत्यांनी सारावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण, या साऱ्यामध्ये तिच्यासाठी सर्वात खास शुभेच्छा ठरल्या त्या अर्थातच अभिनेता कार्तिक आर्यन याच्या. आगामी चित्रपटात सारासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन साराला शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट लिहिली. 

सारासोबतचा तिच्या वाढदिवसाच्याच सेलिब्रेशनमधील एक फोटो त्याने पोस्ट केला. ज्यासोबत त्याने एक कॅप्शनही लिहिलं. या कॅप्शनमधून त्याने साराला 'प्रिंसेस' म्हणत वाढदिवसाच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्तिक साराला 'प्रिंसेस' म्हणतो आणि याची प्रचिती पुन्हा एकदा आली ती म्हणजे साराच्या पुढ्यात दिसणाऱ्या केकवरुन. या केकवरही तिचं हेच नाव लिहिण्यात आलं होतं. 

सारा सध्या बँकॉकमध्ये 'कूली नंबर १' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करत आहे. तिच्या या वेळापत्रकात वाढदिवस आणखी खास करण्यासाठी म्हणून कार्तिक तेथे गेल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्याही नात्याच्याच चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहेत. फक्त कार्तिकत नव्हे, तर सारासुद्धा त्याला भेटण्यासाठी लखनऊला गेली होती, ज्यानंतर या जोडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ही बी- टाऊनमधील बहुचर्चित जोड्यांच्या यादीतील सध्याच्या घडीला सर्वांच्या आवडीची जोडी ठरत आहे.