VIDEO : 'गली बॉय' रणवीर म्हणातोय, 'अपना टाईम आयेगा...'

'वक्त हमारा है....', असं म्हणत अनेकजण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात आणि ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावलं उचलतात. 

Updated: Jan 4, 2019, 01:00 PM IST
VIDEO : 'गली बॉय' रणवीर म्हणातोय, 'अपना टाईम आयेगा...' title=

मुंबई : 'वक्त हमारा है....', असं म्हणत अनेकजण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात आणि ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावलं उचलतात. अभिनेता रणवीर सिंग सध्या अशाच एका कलाकाराचा प्रवास त्याच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. 'गली बॉय' या चित्रपटात रणवीर एका रॅपरच्या भूमिकेत झळकत असून, झोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. 

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी त्यातील एक रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गाण्याचा व्हिडिओ म्हणजे या चित्रपटाचा टीझर आहे, असंच म्हणावं लागेल. 'असली हिप हॉप...', अशा शीर्षकाच्या या गीतात रणवीरचा रॅपर लूक सर्वांच्या भेटीला येतो. त्यासोबतच आलिया आणि त्याच्या भूमिका नेमक्या कशा असतील याविषयीसुद्धा माहिती मिळते. 

मुंबईतील एका लहान वस्तीत राहणारा मुलगा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करत कशा प्रकारे साऱ्या जगात आपल्या कलेच्या बळावर लोकप्रियता मिळवतो याचा संघर्षपूर्ण प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ९ जानेवारी रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

'सिंबा' या चित्रपटाची जादू प्रेक्षकांमधून ओसरत नाही, तोच त्याच्या आगामी 'गली बॉय' या चित्रपटानेही चाहत्यांच्या वर्तुळात उत्सुकतेचं वातावरण निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. रॅपर डिवाईनच्या आतापर्यंतच्या प्रवासावर या चित्रपटाचं कथानक आधारलेलं असून मुंबईच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या असंख्य रॅपर्सच्या संघर्षावरही यातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.