घरात शांतता राखायचीय, रितेश देशमुखनं सांगतिला मोलाचा उपाय

वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, असं म्हणणाऱ्यांसाठी....   

Updated: Oct 4, 2020, 04:37 PM IST
घरात शांतता राखायचीय, रितेश देशमुखनं सांगतिला मोलाचा उपाय  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सहसा घर किंवा अमूक एक वास्तू, राहतं घर ही सर्वतोपरी व्यक्तीच्या प्रगतीसाठीसुद्धा तितकीच कारणीभूत असते अशी धारणा असणाऱ्यांची संख्या कमी नाही. वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते यावर विश्वास ठेवत त्या वास्तूत शांतता, आनंद, सकारात्मकता कशी जपता येईल याकडे अनेकांचं कल दिसतो. मुळात त्यासाठी मग काही उपाययोजनाही अंमलात आणल्या जातात. अर्थात या साऱ्याचा सकारात्मक परिणाम अनुभवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशाच काही मंडळींसाठी आणि वास्तूत शांतता राखू इच्छिणाऱ्यांसाठी आता खुद्द रितेश देशमुख यानं एक उपाय सांगितला आहे. 

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणारा रितेश कायमच त्याच्या पोस्टच्या माध्यमातून अनेकांचं लक्ष वेधत असतो. असा हा अभिनेता आता वास्तूत शांतता कशी राखावी, यासाठीचा उपाय सांगताना दिसत आहे. कोणा एक वास्तूविशारदाप्रमाणे नव्हे तर, रितेशनं अगदी वेगळ्याच अंदाजात हा उपाय सांगिचा आहे. 

एक फोटो शेअर करत, त्यानं ही पोस्ट वास्तूशास्त्रावर विश्वास असणाऱ्या सर्वांसाठी असल्याचं सांगितलं. त्यानं सोशल मीडियावरट व्हायरल होणारा एक फोटो या पोस्टमध्ये शेअर केला. या फोटोमध्ये टीव्ही उलट्या दिशेनं ठेवण्यात आला होता. तर, त्याला कॅप्शन देत लिहिण्यात आलं होतं, 'काही वास्तू विशारदांच्या नव्या निरिक्षणातून हे सिद्ध झालं आहे की टीव्ही सेट तुम्ही उलटा म्हणजे स्क्रिनचा भाग भींतीच्या दिशेनं ठेवल्यास घरात कमालीची शांतता आणि आनंद नांदेल.'

 

रितेशनं शेअर केलेली ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनीही त्यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली. काहींनी लॉकडाऊनच्या काळात टीव्हीचा वाढलेला वापर अधोरेखत केला, तर काहींनी याचे दैनंदिन जीवनात होणारे नकारात्मक बदल सर्वांपुढे मांडले. आता रितेशनं सांगितलेल्या या उपायाचा वापर नेमके कितीजण करतात हे पाहणं मात्र औत्सुक्याचं असेल.