मुंबई : अभिनेता sonu sood सोनू सूद हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली. समाजाप्रती आपण काही देणं लादतो, हे जाणत जबाबदारीनं पावलं उचलणाऱ्या या अभिनेत्याचा आज (३० जुलै) वाढदिवस.
४७ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सोनूचा जन्म पंजाबमधील मोंगा येथे झाला होता. तिथंच त्यानं प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढील शिक्षणासाठी तो नागपूरला आला. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या या अभिनेत्यानं पुढे अभिनयात रस असल्यामुळं मॉडेलिंग सुरु केली. त्यानं मिस्टर इंडिया या स्पर्धेतही भाग घेतला होता.
आजवर हिंदी कलाविश्वात सोनूच्या वाट्याला आलेल्या भूमिका पाहिल्या, तर त्याला खलनायकी भूमिकांसाठी निर्माते- दिग्दर्शकांकडून जास्त पसंती देण्यात आली होती. रुपेरी पडद्यावरील हा खलनायक खऱ्या आयुष्यात मात्र कोणा एका सुपरहिरोहून कमी नाही, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
असं म्हटलं जातं, की सोनू सूद त्याचा वाढदिवस साजरा करत नाही. यामागंही एक खास कारण आहे. एका मुलाखतीदरम्यान खुद्द सोनूनंच याबाबत माहिती दिली होती. आईच्या निधनानंतर आपण वाढदिवसच साजरा करणं बंद केल्याचं तो म्हणाला होता. या दिवशी तो काही खास मित्र आणि कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करतो. कलावनविश्वाच्या झगमगाटात वावरणारा सोनू आजही स्वत:ला सर्वसामान्यांपैकीच एक समजून सेलिब्रिटीपण कैक मैल दूर ठेवताना दिसतो. त्याचा हाच अंदाज त्याला चाहत्यांच्या मनात खास स्थान देऊन जातो.