सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी यशराज फिल्म्समधील महत्त्वाच्या व्यक्तीची चौकशी

सुशांतचे मित्र, त्याची कथित प्रेयसी विविध निर्मिती संस्थांशी संलग्न व्यक्ती यांच्या चौकशीची सत्र सुरु 

Updated: Jun 28, 2020, 09:04 AM IST
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी यशराज फिल्म्समधील महत्त्वाच्या व्यक्तीची चौकशी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बॉलिवूड अभिनेता Sushant Singh Rajput  सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कलाविश्व आणि खुद्द सुशांतचं कुटुंबही एका अनपेक्षित अशा वळणावरुन जाऊ पाहत आहे. १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी सुशांतनं गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. यापूर्वी गेल्या काही महिन्यांपासून तो नैराश्याचा सामना करत असल्याची माहिती समोर आली. 

सध्या मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येच्या मूळ कारणाचा तपास करत आहेत. ज्याअंतर्गत त्यांनी सुशांतचे मित्र, त्याची कथित प्रेयसी विविध निर्मिती संस्थांशी संलग्न व्यक्ती अशांची चौकशी सुरु केली आहे. यातच यशराज फिल्म्स या मोठ्या आणि प्रथितयश निर्मिती संस्थेतील कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मा यांचीही चौकशी करण्यात आली. शनिवारी शानू वांद्रे पोलीस स्थानकात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी आल्या होत्या. 

शर्मा यांचा जबाब नोंदवण्यापूर्वी गतकाळात यशराज फिल्म्समध्ये उप संचालकांच्या पदावर असणाऱ्या आणि सध्या नेटफ्लिक्ससोबत जोडल्या गेलेल्या आशिष सिंह यांचीही चौकशी  करण्यात आली होती. सुशांतंनं कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा यशराजसमवेत त्याच्या कराराच्या मध्यस्थीमध्ये आशिष यांचाही सहभाग होता असं म्हटलं जातं. 

 

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी विविध स्तरांवर चौकशी सुरु असली तरीही त्याच्या शववविच्छेदन अहवालात गळफास लावून आत्महत्या केल्यामुळंच मृत्यू झाल्याचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे. पण, अनेकांनीच सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी असा सूर लावला आहे. त्यामुळं या प्रकरणाला येत्या काही दिवसांमध्ये आणखी नवी वळणं मिळण्याची चिन्हं नाकारता येत नाहीत.