RHTDM मध्ये मुलीवर पाळत ठेवणारा मॅडी तुला पटला का? दिया मिर्झाने 22 वर्षांनी मान्य केली चूक, 'इतकं अस्वस्थ...'

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा 'रहना है तेरे दिल मे' चित्रपट आजही तिच्या चाहत्यांचा आवडता चित्रपट आहे. दरम्यान या चित्रपटात आर माधवन म्हणजेच मॅड तिच्यावर पाळत ठेवत असल्याचं आणि पाठलाग करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावर दिया मिर्झाने आता भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 13, 2023, 02:32 PM IST
RHTDM मध्ये मुलीवर पाळत ठेवणारा मॅडी तुला पटला का? दिया मिर्झाने 22 वर्षांनी मान्य केली चूक, 'इतकं अस्वस्थ...' title=

बॉलिवूडमधील कल्ट चित्रपटांचा जेव्हा कधी उल्लेख होतो, तेव्हा 'रहना है तेरे दिल मे' चित्रपटाचंही नाव प्रामुख्याने घेतलं जातं. 2001 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो. चित्रपटातील गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. आर माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खानची प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटातूनच आर माधवनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दरम्यान या चित्रपटातील एक चूक दिया मिर्झाने मान्य केली आहे. तब्बल 22 वर्षांनी तिने आपल्यालाही ते पटलं नव्हतं असा खुलासा केला आहे. 

या चित्रपटात आर माधवनचं पात्र मॅडी हे दिया मिर्झाच्या एकतर्फी प्रेमात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तो दिया मिर्झाचा पाठलाग करत असतो, तिच्यावर पाळत ठेवत असतो. अनेक प्रेक्षकांना ही बाब खटकली होती आणि त्यांनी यावर आक्षेप नोंदवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून यावरुन वाद-प्रतिवाद सुरु आहे. दरम्यान दिया मिर्झाने एका मुलाखतीत आपल्यालही या गोष्टीवर आक्षेप होता आणि आजही आहे असं मान्य केलं आहे. 

दिया मिर्झाने मुलाखतीत सांगितलं आहे की, "जेव्हा मॅडी माझा पाठलाग करत होता, तेव्हा मी अस्वस्थ होती. माझं पात्र रिनादेखील हे मान्य करते आणि त्याला उत्तर देते. चित्रपटात तो क्षणही येतो जेव्हा रिना त्याला पळवून लावते. पण लोक नंतर पुढे जातात हेदेखील खरं आहे. चित्रपटातही शेवटी मॅडीचं पात्रही चांगलं होतं".

पुढे तिने सांगितलं की, पण मॅडी हे पात्र आपल्या निती मूल्यांप्रती सतर्क असल्याने लोकांना ते आवडलं. "मॅडी हे पात्र नंतर निती, मूल्यांचं पालन कऱणारं होतं. ते प्रामाणिक, सभ्य, दयाळू होतो आणि हे जास्त महत्त्वाचं आहे," असं ती म्हणाली. 

रीनाला चित्रपटात मॅडी आणि सॅम यापैकी एकाची निवड करायची असते. यावर दिया मिर्झाने सांगितलं की, "सॅम चांगली व्यकी होती. सॅमला का सोडलं यावरुन मीदेखील हैराण होती".  यावेळी दिया मिर्झाने  'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाचं उदाहरण दिलं. या चित्रपटात ऐश्वर्या राय अजय देवगणसोबत राहण्यासाठी सलमान खानला सोडते. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळे दृष्टीकोन पाहणं हे रंजक असतं असं तिने सांगितलं. तसंच जर या चित्रपटाचा सिक्वेल आला तर हे पात्र आता कुठे असतील हे पाहणंही रंजक असेल असं ती म्हणाली आहे.