आपल्या बोल्ड अभिनयाने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत ((Mallika Sherawat)) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत मल्लिका शेरावतने आपलं बालपण आणि महिला म्हणून झालेला भेदभाव याबद्दल सांगितलं. हरियाणात मोठी होताना तिने पितृसत्ताक समाजातील कठोर वास्तव अनुभवलं असल्याचं तिने सांगितलं.
"मला कोणाचाही पाठिंबा नाही. ना माझी आई, ना माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला. माझ्या कुटुंबानेही मला पाठिंबा दिला नाही," असं मल्लिका शेरावतने Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मल्लिकाने यावेळी तिच्या कुटुंबानेही इतरंप्रमाणे पितृसत्ताक चक्र कायमस्वरूपी कायम ठेवलं, ज्यामुळे तिच्या संधी आणि स्वातंत्र्यावर मर्यादा आल्याचाही खुलासा केला.
“पुरुष स्त्रियांना कसं वागवतात ही वेगळी बाब आहे. पण स्त्रियाच स्त्रियांना कसं वागवतात त्याचं काय? महिलाच दुसऱ्या महिलांना पितृसत्ताक खुंटीला बांधून ठेवतात आणि सर्व दरवाजे बंद करतात. त्या इतर महिलांसाठीही दरवाजा उघडत नाहीत," अशी खंत मल्लिका शेरावतने व्यक्त केली.
आपल्या बालपणाबद्दल बोलताना सांगितलं की, "माझे आई-वडील माझ्यात आणि भावात फार भेदभाव करायचे. आई-वडील मला असं का वागवतात याचा विचार करत मी फार दु:खी व्हायचे. लहान असल्याने मला काय करावं हे समजत नव्हतं, पण आता समजू लागलं आहे. तो मुलगा आहे त्याल परदेशात पाठवा, त्याला शिकवा, त्याच्यात पैसे गुंतवा. कुटुंबाची सर्व संपत्ती मुलाकडे, नातेवाईकाकडे जाणार. मुलींचं काय आहे? त्या लग्न करतील, त्या ओझं असतात".
पुढे ती म्हणाली, "मला याबद्दल फार वाईट वाटायचं. पण माझ्या लक्षात आलं की, मी एकटीच नाही आहे. माझ्या गावातील सर्व मुलींना हा अन्याय सहन करावं लागत असल्याची जाणीव मला झाली".
“माझ्या आई-वडिलांनी मला सर्व काही दिलं. चांगलं शिक्षण दिले, पण खुली मानसिकता किंवा चांगले विचार नाही. त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं नाही. त्यांनी माझे पालनपोषण केलं नाही, मला समजून घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही”, असंही ती म्हणाली. फक्त मुलगी असल्यानेच आपल्याला खेळापासून दूर ठेवण्यात आलं अशी आठवण तिने सांगितली. “मी लपून छपून खूप खेळत होते. कारण माझ्या कुटुंबाने मला परवानगी दिली नव्हती. 'तुम्ही खूप मर्दानी, पुरुषी व्हाल. तुझ्याशी कोण लग्न करेल? अशी माझ्यावर खूप बंधने होती," असं तिने सांगितलं.