मुंबई: आव्हानात्मक आणि चौकटीबाहेरील भूमिकांना न्याय देणारी अभिनेत्री म्हणून पाहिलं जाणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे राधिका आपटे. फार कमी कालावधीत हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी ही अभिनेत्री.
'सेक्रेड गेम्स' आणि 'घौल' या दोन्ही वेब सीरिजमधून तिच्या अभिनयाने तर खऱ्या अर्थाने जादू केली. ही जादू थेट नेटफ्लिक्सपर्यंतही पोहोचली आणि सर्वत्र राधिकाच पाहायला मिळू लागली. सोशल मीडियावर तर याविषयीचे मीम्सही व्हायरल झाले होते.
सध्याच्या घडीला यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या राधिकाला मात्र एका गोष्टीची धास्ती आहे.
येत्या काळातही आपल्याला चांगले प्रोजेक्ट मिळणार की त्यासाठी संघर्ष करावा लागणार, हा प्रश्न तिच्या मनात घर करत आहे.
'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना तिने याविषयीची माहिती दिली.
फ्रिलान्सिंग क्षेत्रात नेहमीच प्रदीर्घ काळासाठी तग धरण्याचं मोठं आव्हान असतं. इथे तुमच्या करिअरचा आलेख खालीही जाऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही फ्रिलान्सिंग करत असता तेव्हा पुढे कोणती संधी मिळणार, याकडेच तुमचं लक्ष लागून राहिलेलं असतं. संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही, हा महत्त्वाचा मुद्दा तिने मांडला.
कलाविश्वात पुढचा बराच काळ तग धरण्याचा मनसुबा राधिकाने बाळगला असून, त्या अनुषंगाने ती कामही करत आहे. येत्या काळातही तिला चांगल्या चित्रपट आणि इतर प्रोजेक्ट्सची ऑफर मिळेल अशी तिला आशा आहे.
एक कलाकार म्हणून राधिकाला वाटणारी ही भीती स्वाभाविक असून, तिच्या करिअरसाठी ही बाब तितकीच पूरकही ठरु शकते. कारण, कोणत्याही गोष्टीचा अंत नसतो हे म्हणतात ते खरंच आहे आणि राधिकाही त्याच वाटेवर चालत असल्याचं स्पष्ट होत आहे.