सुशांतवरील #MeToo आरोपांबाबत अभिनेत्री म्हणते, मुलीला न विचारताच....

तेव्हा त्यांना वाटतं की... 

Updated: Jul 23, 2020, 10:07 AM IST
सुशांतवरील #MeToo आरोपांबाबत अभिनेत्री म्हणते, मुलीला न विचारताच....
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला महिन्याभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे. सुशांतच्या आत्महत्येमागचं मुख्य कारण अद्यापही कळू शकलेलं नाही. किंबहुना त्याच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपासही सुरु आहे. या साऱ्यामध्येच त्याच्या शेवटच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 

निधनानंतरही सुशांत त्याच्या अभिनय कलेनं प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज असतानाच आता त्याच्या Dil Bechara 'दिल बेचारा' या चित्रपटातील सहअभिनेत्री संजना सांघी हिच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संजनानं सुशांतवर करण्यात आलेल्या #MeToo आरोपांवरुन मौन सोडलं आहे. २०१८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही वृत्तांनुसार संजनानं सुशांतवर #MeToo अंतर्गत आरोप केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यादरम्यानच त्यांच्या चित्रपटाचं चित्रीकरणही सुरु होतं. 

संजनानं या सर्व वृत्तांबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. 'जेव्हा दोन व्यक्ती, खूप चांगले मित्र एका चित्रपटासाठी काम करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या बाबतीत एक दोन ठिकाणी वृत्त छापून येतं. तेव्हा त्यांना वाटतं की वेळेसोबत याचा विसर पडेल. कारण, नेमकं सत्य काय आहे हे आम्हालाच ठाऊक आहे. पण, दु:ख या गोष्टीचं वाटतं की, मुलीला न विचारताच तिच्याविषयी लिहिलं जातं. त्यांना फक्त लिहायचंच असतं. त्या मुलीनं असे असे आरोप केले हे तुम्ही तिला न विचारता लिहूच शकत नाही. पण, तरीही असं झालं. हो अर्थात यामुळं सुशांत आणि मी अडचणीत आलो होतो. जेव्हा हे प्रमाण वाढलं तेव्हा मात्र आम्ही सत्य सर्वांपुढं आणण्याचा निर्णय घेतला. पण तरीही याचा संबंध #MeToo शी जोडला गेला. पण, तसं काहीच नव्हतं.'

 

संजना आणि सुशांतच्या बाबतीत छापून आलेली ही वृत्त त्याच काळाच प्रसिद्ध झाली होती, जेव्हा देशभरात #MeToo मोहिमेला चांगलीच हवा मिळाली होती. बरीच प्रकरणं याअंतर्गत समोर येत होती. पण, या साऱ्यामध्ये संजनाच्या नावे चुकीची माहिती देत त्यात सुशांतवर गंभीर आरोप करण्यात आले होते. जे संजनानं फेटाळून लावले आहेत.