मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या अभिनय कौशल्यासोबतच शारीरिक सुदृढतेसाठीही ओळखली जाते. सुष्मितानं आतापर्यंत आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर काही महत्त्वाचे आणि तितकेच धाडसी निर्णय घेतले आहेत.
खासगी जीवनातही बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीनं कायमच काही आदर्श प्रस्थापित केले आहेत. एकल मातृत्त्वाची जबाबदारी घेत सुष्मितानं दोन मुलींना मोठं केलं.
एकिकडे जीवनात स्थैर्य मिळत असतानाच दुसरीकडे सुष्मिता 2014 पासून एका गंभीर आजारानं झुंज देत असल्याची बाब समोर आली.
आपल्या आजारपणाचे दिवस अतिशय वेदनादायी होते, असंही तिनं सांगितलं होतं. अॅडिसन या आजारानं सुष्मिताला ग्रासलं होतं.
उपचाचरांचा भाग म्हणून तिला स्टेरॉईडचा पर्याय देण्यात आला ज्यामध्ये कोर्टिसोलचा समावेश होता. याचे फारच दुष्परिणाम होते.
आजाराशी दोन हात करताना आपण सर्व ताकद गमावून बसलेलो, असं सुष्मितानं सांगितलं. पण, दररोजच्या व्यायामानं ती बरी होत गेली आणि पूर्वीपेक्षा अधिक सुदृढही.
अॅडिसन या आजाराशी लढा देण्याबाबत सुष्मिता म्हणालेली, '2014 मध्ये अॅडिसन नावाच्या एका ऑटो इम्यून परिस्थितीबाबत माहिती झाली तेव्हा मी फारच हताश झाले. त्यावेळी माझ्या शरीरात फक्त आणि फक्त निराशा आणि आक्रमकता उरली होती.
पुढे मलाच मानसिकरित्या कणखर होण्यासाठीचा मार्ग शोधावा लागला होता'. सुष्मिताची ही लढाई तितकी सोपी नव्हती.
वेळीच उपचार न झाल्यास हा आजार जीवावर बेततो. थकवा, वजन वाढणं, त्वचा काळवंडणं, रक्तदाब कमी होणं, मीठ खाण्याची इच्छा होणं ही या आजाराची लक्षणं आहेत.
एड्रीनल ग्लँड नष्ट झाल्यानंतर हा रोग उदभवतो. सुष्मितानंही या साऱ्याचा सामना केला. पुढे, ननचाकू ध्यान करत तिनं उपचार सुरु केले आणि याचा तिला मोठा फायदा झाला. वेळीच ती बरी होऊ लागली.
ननचाकू एक असं तंत्र आहे ज्याला चेन स्टीकही म्हटलं जातं. इथं लहानशा साखळीला दोन छड्या जोडलेल्या असतात. शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी या तंत्राचा वापर होतो.
आजारपणाच्या काळानं आपल्याला एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे परिस्थितीपुढे हतबल न होता जिद्दीनं लढा आणि कधीच माघार घेऊ नका, असं सुष्मिता आवर्जून सांगते.