मुंबई : साचेबद्ध भूमिकांना शह देत काही आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री तापसी पन्नू ओळखली जाते. तिच्या अशाच काही गाजलेल्या भूमिकांपैकी एक म्हणजे 'मनमर्झियाँ' चित्रपटातील 'रुमी'. एका बेधडक तरुणीच्या भूमिकेत तापसी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तिचं हे रुपही अनेकांच्या पसंतीस उतरलं.
प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण जपत असताना, त्या भूमिका जगत असताना तापसी त्यांच्याशी एकरुप होऊन जाते. चित्रपटानंतर ती या भूमिकांतून बाहेरही पडते पण, त्यातील काही अंश मात्र तिच्यामध्ये कायम राहतो. खुद्द तापसीनेच याविषयीचा एक प्रसंग सांगितला.
बेधडक आणि अन्याय, चुकिच्या गोष्टींविरोधात उभी ठाकणाऱ्या तापसीच्या याच रुपाने एका प्रसंगी डोकं वर काढलं होतं. एका मुलाखतीदरम्यान तिने या प्रसंगाचा उलगडा केला. ज्यावेळी चित्रीकरणानंतर ती बहिणीसोबत रात्रीच्या जेवणासाठी बाहेर गेली होती. जेवणानंतर ती आणि तिची बहीण रस्त्याच्या एका बाजूला उभे होते. त्याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने न विचारता तिचा फोटो काढण्यास सुरुवात केली.
अनोळखी व्यक्तीचं हे असं वागणं पाहून तापसीचा राग अनावर झाला आणि तिने त्याला खडे बोल सुनावत ताकीद दिली. 'फोन आत ठेव नाहीतर.... तोडून टाकेन....' या शब्दांत तिने त्याला निशाण्यावर घेतलं. एक अभिनेत्री, कलाकार म्हणून जगत असतानाच एक व्यक्ती म्हणूनही आपल्या काही आवडीनिवडी, पसंत नापसंत आहे. त्यामुळे या मर्यादा ओळखतच चाहत्यांनीही कलाकारांच्या खासगी आयुष्याचा आदर केला पाहिजे हीच बाब प्रकर्षाने समोर येत आहे.
चित्रपटांच्या बाबतीत सांगावं तर, तापसी सध्या 'गेम ओव्हर' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. चांगलं कथानक आणि स्टारकास्ट असूनही तिच्या या चित्रपटाला मात्र बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. क्रिकेट विश्वचषकाचा फटका फक्त याच चित्रपटाला नव्हे, तर इतरही काही चित्रपटांना बसला आहे.