मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूची लागण होण्याचं प्रमाण दर दिवसागणिक वाढू लागलं आहे. जगभरात या विषाणूने थैमान घातलेलं असतानाच भारतामध्येही त्याची प्रचंड दहशत पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून समाजातील प्रत्येक स्तरावर कोरोनाची भीती आहे. यातच आता कलाविश्वातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कनिका कपूर, शजा मोरानी, तिची बहीण यां साऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच त्यांच्यावर वेळीच उपचार सुरु झाले. आता आणखी एका अभिनेत्याचा किंबहुना त्याच्या पूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. खुद्द या अभिनेत्यानेच याविषयीची माहिती एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली.
किरकोळ ताप आणि सर्दी असल्याचं सांगत आपल्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार कोरोना झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. कुटुंबासह सध्या कोरोनाशी झुंज देणारा हा अभिनेता म्हणजे पूरब कोहली. मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या पूरबने कशा प्रकारे त्याच्या कुटुंबात सर्दी, ताप अशी लक्षणं बळावर गेली आणि त्यांना अखेर कोरोना झाल्याची बाब उघड झाल्याचं सांगण्यात याची माहिती दिली आहे.
पूरबची मुलगी इनाया हिला सर्वप्रथम कोरोनाची लक्षणं दिसून आली. ज्यानंतर त्याची पत्नी ल्यूसीलाही हा संसर्ग झाला. दोन आठवड्यानंतर आता आम्ही या कोरोनाशी झुंज देतच आहोत, असं पूरबने लिहिलेल्या पोस्टमधील कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. पूरबची ही पोस्ट पाहता, आता तो आणि त्याचं संपूर्ण कुटुंब यातून सावरावं अशीच कामाना चाहत्यांनीही केली आहे.