बिग बींच्या यशात मोलाचा हातभार लावणाऱ्या कादर खान यांना कलाविश्वाकडून श्रद्धांजली

'या' सेलिब्रिटींनी व्यक्त केलं दु:ख 

Updated: Jan 1, 2019, 11:46 AM IST
बिग बींच्या यशात मोलाचा हातभार लावणाऱ्या कादर खान यांना कलाविश्वाकडून श्रद्धांजली  title=

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ८१ व्या वर्षी कॅनडातील टोरंटो येथे असणाऱ्या एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलगा सरफराज यानेच त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

'हो... आज सकाळी माझे बाबा आपणा सर्वांना सोडून गेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. ज्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आम्ही फार प्रयत्न केले, पण अखेर जे व्हायचं तेच झालं', असं तो म्हणाला. खान यांच्यावर सर्वांचच खूप प्रेम होतं. शिवाय ते स्वत:सुद्धा इतरांवर, आपल्या माणसांवर खूप प्रेम करत, असंही त्याने सांगितल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलं. 

खान यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाच्या माध्यमातून आता अनेकांनीच त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. कलाकार मंडळींनीही खान यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाचा आधार घेत एक अष्टपैलू कलाकार सिनेजगताने गमावल्याचं दु:ख व्यक्त केलं. 

व्यासपीठावरील एक सच्चा कलाकार, मोठ्या ताकदीचा लेखक, माझ्या बऱ्याच यशस्वी चित्रपटांचा लेखक आणि एक चांगला गणिततज्ज्ञ आज आपल्यातून हरपला, असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी कादर खान यांना श्रद्धांजली वाहिली.

फक्त कलाच नव्हे, तर राजकीय वर्तुळातील मंडळींनीही खान यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. ज्यामध्ये विनोद तावडे, सुप्रिया सुळे यांच्या नावांचा सहभाग आहे.