मुंबई : काही दिवसांपूर्वीच आपल्याला स्तनांचा कर्करोग झाल्याची माहिती देत एका मोठ्या शस्त्रक्रियेला आपण सामोरं गेल्याचं एका अभिनेत्रीनं सांगितलं. सोशल मीडियावर एक सुरेख पोस्ट लिहित तिनं यादरम्यान आपण लग्नाचा वाढदिवसही कसा साजरा केला याची माहिती चाहत्यांना दिली. (chhavi mittal breast cancer)
छवी मित्तल असं या अभिनेत्रीचं नाव. बऱ्याच लोकप्रिय मालिकांमधून झळकलेली ही अभिनेत्री सध्या जीवनातील आव्हानात्मक प्रसंगाचा सामना करत आहे. गेले काही दिवस रुग्णालयात उपचार घेणारी हीच सौंदर्यवती आता घरी परतली आहे.
शॅम्पू करुनही इतका आंद वाटेल याची आशाही केली नव्हती, अशा शब्दांत ती व्यक्त झाली. घरी आल्यानंतर मैत्रिणीसोबत फेरफटकाही मारला, कारण मला आता यातून सावरायचं होतं... असं ती म्हणाली.
कॅन्सर ही एक अशी गोष्ट आहे, ज्याची लागण झाल्यानंतर कोणालाही आनंद होणार नाही. पण, दुर्दैवानं तसं झाल्यास जगणं थांबवलं नाही पाहिजे, असं छवी म्हणाली. आता मी कशी आहे...? असा प्रश्न विचारणाऱ्यांना मी उत्तम असल्याचं सांगत छवीनं सर्वांचेच त्यांच्या प्रार्थनांसाठी आभार मानले.
अडथळा कोणताही असो, जगणं आणि तेही आनंदानं जगणं थांबलं नाही पाहिजे असंच छवीच्या या पोस्टमधून वाचायला मिळालं.
जीवनातील एका अतिशय आव्हानात्मक वळणावरून जात असताना छवीकडे पाहिलं असता तिच्यावर संकटांचा डोंगर कोसळलेला असतानाही चेहऱ्यावर असणारा आनंद तिनं तसुभरही कमी होऊ दिलेला नाही. हीच बाब सर्वांनी शिकण्याजोगी, नाही का...