प्रतीक्षा संपली... 'तारक मेहता...' मालिकेत लवकरचं होणार दयाबेनची एन्ट्री

दयाबेनची मालिकेत पुन्हा एन्ट्री होणार असल्यामुळे चाहते फार उत्साहीत आहेत. 

Updated: Apr 24, 2021, 09:52 AM IST
प्रतीक्षा संपली... 'तारक मेहता...' मालिकेत लवकरचं होणार दयाबेनची एन्ट्री

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गोकूळ धाम सोसायटीमुळे कायम चर्चेत असते. 'तारक मेहता..' मालिकेचे चाहते कायम दोन प्रश्न विचारत असतात. पहिला प्रश्न म्हणजे मालिकेत दयाबेनची एन्ट्री कधी होणार? दुसरा प्रश्न म्हणजे पोपटलालचं लग्न कधी होणार? पोपटलालच्या लग्नाचं तर सांगता येणार नाही. पण दयाबेनची एन्ट्री मालिकेत लवकरचं होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दयाबेनची मालिकेत पुन्हा एन्ट्री होणार असल्यामुळे चाहते फार उत्साहीत आहेत. 

मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेन पुन्हा कधी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार याचं उत्तर दिलं आहे. दायबेन फेम अभिनेत्री दिशा वकानी गेल्या  3 वर्षांपासून मालिकेपासून दूर आहे. दिशा मॅटरनिटी लिव्हसाठी गेली होती. त्यानंतर ती पुन्हा मालिकेत दिसलीचं नाही. दिशाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागणार असल्याची चर्चा देखील रंगत होती.

पण या सर्व चर्चांना असित मोदी यांनी पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, 'दिशा वकानीची भूमिका दुसरी  अभिनेत्री साकारू शकणार नाही. त्यामुळे 3 वर्ष दिशाची प्रतिक्षा करावी लागली. पण आता कोरोना महामारीनंतर दिशाची एन्ट्री मालिकेत होणार आहे.'  असित मोदी यांनी देखील दिशा वकानीच्या प्रतिक्षेत असल्याचं सांगितलं होतं.