मुंबई : 'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या अभिनयाने आणि स्वभावाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. फक्त साऊथमध्येचं नाही, तर ,संपूर्ण जगात त्याच्या चाहत्यांचा बोलबाला आहे. सर्वांच्या मनात अधिराज्य गाजवणार अल्लू सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनवर एका शैक्षणिक संस्थेचा प्रचार करत असल्याची टीका केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी दावा केला आहे की, अल्लू अर्जुनचा चेहरा दर्शविणारी विशिष्ट जाहिरात दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती देत होती. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याची मागणीही कार्यकर्त्याने केली आहे.
अल्लू अर्जुनने जाहिरातीत दिसल्याबद्दल आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांविरुद्ध खोटी माहिती दिल्याबद्दल कार्यकर्त्याने अंबरपेट पोलिसांत तक्रार दाखल केली.
लोकांची दिशाभूल आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांविरोधात कारवाई करण्याची मागणी उपेंद्र रेड्डी यांनी केली आहे. याआधी, अल्लू अर्जुनला फूड डिलिव्हरी अॅपचे मार्केटिंग केल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला होता.
सरकारी वाहतूक सेवांकडे दुर्लक्ष करून बाइक अॅपची जाहिरात केल्याबद्दल अभिनेत्याला चेतावणी देण्यात आली होती. त्यामुळे आता अल्लू या अडचणीचा सामना कशाप्रकारे करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.