मुंबई : गुगल हे एक असं माध्यम आहे जे कायम डूडलच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यक्तींच्या कार्याला दुजोरा देत त्यांचा सन्मान करतो. आज देखील गुगलने डूडलच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांच्या कार्याला सलाम केला आहे. जोहरा सेहगल यांनी एक उत्तम अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जोहरा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या देशातील काही कलाकारांपैकी एक आहेत. जोहरा यांचा जन्म २७ एप्रिल १९१२ रोजी सहारनपूरमध्ये झाला होता.
आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. १९९८ साली पद्मश्री पुरस्कार, २००१ साली कालिदास सन्मान, २०१० साली तर त्यांना पद्म विभूषण सारख्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांचा नृत्याचा आणि अभिनयाचा प्रवास त्यांच्या लहानपणापासूनच सुरू झाला.
त्यांनी जर्मनीमधील ड्रेसडेनमधील बॅलेट स्कूलमधून नृत्याचे प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्या फक्त नृत्यासाठी मर्यादीत न राहता इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरूवात केली.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी 'सांवरिया', 'कल हो ना हो', 'वीर-झारा', 'चलो इश्क लड़ाएं', 'हम दिल दे चुके सनम', 'कभी खुशी कभी गम' अशा एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारात चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
जोहरा सेहगल यांनी आपल्या ६० वर्षांच्या प्रवासात कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यांची आजी भूमिका आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. त्यांनी परदेशी कलावविश्वामध्ये आपले नाव कोरले. अखेर १० जुलै २०१४ साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला.