बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची (Kangana Ranaut) प्रमुख भूमिका असणारा 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणं अपेक्षित होतं. कंगना रणौतने चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. चित्रपटाला अद्याप सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून (CBFC) प्रमाणपत्र मिळू न शकल्याने, याआधी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेली त्याची रिलीज तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारने धार्मिक भावना दुखावू शकत नाही असं म्हटलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असल्यानेच इर्मजन्सी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. "काही धार्मिक संस्थांनी आपली शंका उपस्थित केली आहे. धार्मिक भावना दुखावू शकत नाही. चित्रपटात काही संवेदनशील आशय आहे. सरकार संस्थांनी व्यक्त केलेली चिंता गांभीर्याने घेत आहे", अशी सूत्रांची माहिती आहे.
अनेक शीख संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट शीख समाजाचं चुकीचं चित्रण करतो असा दावा त्यांनी केला आहे. शीर्ष गुरुद्वारा संस्था शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) 'आणीबाणी'च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, शिखांच्या इतिहासाचं चुकीचं वर्णन करण्यात आलं असून, शीखांच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान भाजपाची खासदार असणारी कंगना रणौत जी या चित्रपटाती निर्माता आणि दिग्दर्शक आहे तिने हे फार निरुत्साह आणि अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. तिने यावेळी तिचा चित्रपट आणि नेटफ्लिक्स मालिका 'IC814: द कंदहार हायजॅक' यांच्यात तुलना केली आहे. सेन्सॉरशिप फक्त त्यांच्यासाठी आहे जे "ऐतिहासिक तथ्यांवर" आधारित चित्रपट बनवतात असा संताप तिने व्यक्त केला आहे.
"देशातील कायदा असा आहे की, कोणीही कोणत्याही परिणामाशिवाय किंवा सेन्सॉरशिपशिवाय OTT प्लॅटफॉर्मवर कितीही प्रमाणात हिंसा आणि नग्नता दर्शवू शकतो, कोणीही त्यांच्या राजकीयदृष्ट्या प्रेरित वाईट हेतूंसाठी वास्तविक जीवनातील घटनांचा विपर्यास करू शकतो, अशा देशद्रोही अभिव्यक्तींसाठी जगभरात कम्युनिस्ट किंवा डाव्या विचारसरणीसाठी सर्व स्वातंत्र्य आहे,” अशी टीका तिने केली आहे.
दुसरीकडे IC814 चे दिग्दर्शक अनुभव सिन्हाही वादात अडकले आहेत. विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांचीय नावं बदलल्याने वाद निर्माण झाला आहे. नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडला याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. सरकार हे फार गांभीर्याने घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.