लडाखमध्ये मराठमोळी 'खानावळ'; व्हेज, नॉनव्हेज थाळीवर ताव मारून समीर चौघुले तृप्त

Ladakh Tour : मिसळ, साबुदाणा खिचडी पाहून आणि खाऊन तेसुद्धा भारावले. ही ; मराठमोळी 'खानावळ' तुमचीही वाट पाहतेय, कधी जाताय? हे घ्या लोकेशन आणि पत्ता

सायली पाटील | Updated: Jun 15, 2023, 06:19 AM IST
लडाखमध्ये मराठमोळी 'खानावळ'; व्हेज, नॉनव्हेज थाळीवर ताव मारून समीर चौघुले तृप्त title=
hasyajatra fame Actor Samir Choughule went to ladakh visits maharashtrian food restaurant khanaval ladakh watch video

Ladakh Tour : एखाद्या ठिकाणी बऱ्याच दिवसांसाठी गेल्यानंतर एक क्षण असा येतो जेव्हा आपल्याला स्वगृही परतण्याचे वेध लागतात. बरं, स्वत:च्या घरी परतल्यानंतर 'सर्वात पहिलं काम तुम्ही काय करणार?' असा प्रश्न कोणी विचारला तर क्षणाचाही विचार न करता आपलं उत्तर असतं, 'आम्ही पोटभर जेवणार'. बस्स, या ओळीपुढे आपल्या डोळ्यांसमोर येतं ते घरच्या साग्रसंगीत जेवणाचं ताट. भटकंतीसाठी, कामानिमित्त किंवा आणखी कोणत्या कारणानं घरापासून दूर असणाऱ्यांची मतं या एका मुद्द्यावर जुळतात यातच मुळात दुमत नाही. 

घरच्या जेवणाची ही लज्जत आणखी वाढणार आहे, कारण आता हे जेवण थेट लडाखपर्यंत पोहोचलं आहे. महाराष्ट्राची वेस ओलांडल्यानंतर प्रदेश बदलतो तसतसं तिथले खाद्यपदार्थ आणि खाद्यसंस्कृतीही बदलताना दिसते. चवी आणि मसाले बदलतात. तेल- तुपाचं प्रमाणही बदलतच. सुरुवातीला हा बदल नवा वाटतो पण नंतर मात्र साधे पोहेसुद्धा ब्रह्मानंदी टाळी लागल्याचा अनुभव देऊन जातात. 

सध्या लडाखमध्ये येणाऱ्या मराठी भाषिक आणि इतरही सर्वच पर्यटकांसाठी हा अनुभव मिळत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे इथं सुरु झालेलं 'खानावळ' नावाचं एक रेस्तराँ. काही तरुण आणि होतकरु शिवाय भटकंतीवर नितांत प्रेम करणाऱ्या प्रशांत ननावरे, ग्रीष्मा सोले आणि कौस्तुभ दळवी या मंडळींनी थेट लेह लडाखमध्ये ही 'खानावळ' सुरु केलीये, जिथं येणाऱ्या खवय्यांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. 

हेसुद्धा वाचा : Ashadhi Ekadashi 2023 : वारीच्या नाना परी! अबालवृद्धांना लागली विठ्ठलभेटीची आस; पाहा काही Exclusive Photos 

'हास्यजत्रा' फेम मराठी अभिनेते समीर चौघुले यांनीही नुकतीच या ठिकाणाला भेट दिली होती. तिथं जाऊन साबुदाणा खिचडी, मिसळीसोबतच त्यांनी शाकाहारी आणि मांसाहारी थाळीवरही ताव मारला. प्रेक्षकांना आपल्या विनोदी शैलीनं आनंद देणाऱ्या या अभिनेत्यातील खवैय्यानं थेट लहाखमधूनच या खानावळीला उत्फूर्त दादही दिली. 

खानावळमध्ये पोह्यांपासून चिकन थाळीपर्यंत सर्वकाही मिळतंय... 

इथं खानावळमध्ये तुम्हाला अस्सल मराठमोळ्या पद्धतीच्या नाश्त्यासोबतच जीभेचे चोचले पुरवणारे चमचमीत पदार्थ, जसंकी पाटवडी, बटाटावडा, चिकनचा रस्साही मिळतोय. त्यामुळं आता ही 'खानावळ' नेमकी कुठंय, तिथं काय काय मिळतं याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वजण सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. 

तुम्हीही भविष्यात कधी लेह-लडाखला जाणार असाल तर तिथं जाऊन मोमोस, थुक्पा आणि स्थानिक पदार्थ नक्की खा. पण, या सहलीत एकदा 'खानावळ'च्या पंगतीत नक्की बसा आणि मन तृप्त होईपर्यंत घरच्यासारखं जेवण जेवा.