आम्हाला शिल्पाची नाही तर तिच्या मुलांची चिंता - हायकोर्ट

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणी हायकोर्टाने व्यक्त केली मुलांबद्दल चिंता

Updated: Sep 22, 2021, 08:54 AM IST
आम्हाला शिल्पाची नाही तर तिच्या मुलांची चिंता - हायकोर्ट

मुंबई : उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे मोठ्या अडचणींमध्ये अडकला होता. अखेर जवळपास 2 महिन्यांनंतर त्याला जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान आम्हाला अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अल्पवयीन मुलांबद्दल मीडियामध्ये आलेल्या बातम्यांबद्दल चिंतेत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं. जुलैमध्ये पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने तिच्यावर आणि तिच्या कुटुंबाविरोधात बदनामीकारक लेख आणि व्हिडिओ प्रकाशित केल्याचा दावा दाखल केला होता, ज्याची सुनावणी न्यायमूर्ती गौतम पटेल करत आहेत.

अभिनेत्रीने आपल्या याचिकेत मीडियाला "चुकीची, खोटी, दुर्भावनापूर्ण" माहिती प्रकाशित करण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. आपण त्यावर बंदी  घालू शकत नाही असं न्यायालयाने सांगितलं. पण यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेले तीन व्हिडिओ हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

सोमवारी, शेट्टीचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितले की ते माध्यमांशी, ब्लॉग आणि व्लॉग चालवणाऱ्यांशी चर्चा करत आहेत आणि त्यातील अनेकांनी आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यास सहमती दर्शविली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरला होणार आहे. शिवाय, शिल्पाचे वकील अभिनव चंद्रचूड यांना याचिकेची सुनावणी करण्याची घाई का आहे, असा सवालही न्यायालयाने केला.

 'मला शिल्पा शेट्टीची चिंता नाही... ती स्वतःची काळजी घेईल. मला त्यांच्या अल्पवयीन मुलांची जास्त काळजी आहे. शेट्टी आणि त्यांच्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यावरील मीडिया रिपोर्ट चिंतेचा विषय आहे ... या प्रकरणाचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो.' असं  न्यायाधीश पटेल म्हणाले.