अभिनेत्री थोडक्यात वाचली; केकवरची मेणबत्ती विझवताना तुमच्यासोबतही होऊ शकतो असा अपघात

बर्थ डे पडला महागात...   

Updated: Sep 23, 2021, 03:02 PM IST
अभिनेत्री थोडक्यात वाचली; केकवरची मेणबत्ती विझवताना तुमच्यासोबतही होऊ शकतो असा अपघात
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : वाढदिवस म्हटलं की, केक कापणं आलं आणि केक आला की त्यावर मेणबत्तीही आलीच. प्रत्येकाच्याच वाढदिवसाच्या काही आठवणी असतात. बर्थ डे बॉम्ब्स, बर्थ डे केक स्मॅश, विश फाइंड आणि बरंच काही. सध्या एका हॉलिवूड अभिनेत्रीचा वाढदिवस नुकताच पार पडला आणि त्याच्या बऱ्याच चर्चाही झाल्या. खुद्द अभिनेत्रीनंच सोशल मीडियावर या क्षणांचा व्हिडीओ शेअर केला. 

अमेरिकन अभिनेत्री निकोल रिचीनं अधिकृत इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमधील दृश्य पाहून सोशल मीडियावर एकच गोंधळ पाहायला मिळाला. केकवर असणाऱ्या मेणबत्त्या विझवण्यासाठी निकोल जेव्हा पुढे वाकली तेव्हा काहीसं दुर्लक्ष झालं आणि एक अपघात झाला. प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. 

निकोलनं केक कापतेवेळी केस मोकळे सोडले होते. मेणबत्ती विझवण्यासाठी म्हणून ती जेव्हा पुढे वाकली तेव्हा तिच्या केसांनी मेणबत्तीच्या ज्योतीमुळं पेट घेतला. काही सेकंदांतच तिच्या केसांना आग लागली. समयसूचकता दाखवली नसती तर, त्यावेळी बर्थ डे पार्टीमध्ये होत्याचं नव्हतं झालं असतं. आपले केस जळत असल्याचं पाहून निकोलही किंचाळली. तिनं हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनीच चिंता व्यक्त केली. 

दरम्यान, कोणाच्याही वाढदिवसाला हा अपघात होऊ शकतो. त्यामुळं ज्वलनशील पदार्थ किंवा वस्तू वापरली जात असताना त्याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे, अन्यथा होणारं नुकसान टाळता येणं अशक्य होतं.