''तुमच्यासाठी लता मंगेशकर गेल्या, आमच्यासाठी ....'' - आशा भोसले

दीदींच्या जाण्यावर संपुर्ण मंगेशकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

Updated: Feb 28, 2022, 02:33 PM IST
 ''तुमच्यासाठी लता मंगेशकर गेल्या, आमच्यासाठी ....'' - आशा भोसले  title=

पुणे : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप जरी घेतला असला, तरी त्यांची गाणी आणि आठवणी यामुळे त्या आजही सगळ्यांच्या मनात अजरामर आहेत.

दीदींच्या जाण्यावर संपुर्ण मंगेशकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच संपुर्ण मंगेशकर कुटुंब लता दीदींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात एका कार्यक्रमात पोहोचलं.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, पं. हृद्यनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, प्रसिद्ध गायक रुपकुमार सह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. 

या कार्यक्रमात मान्यवरांनी आणि लता दीदींचा सहवास लाभलेल्या अनेकांनी लता दीदींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. पण यावेळी आशा भोसले बोलू लागल्या आणि सगळेच शांत झाले. उपस्थित असलेले सगळेच आशा भोसले बोलत असताना भावूक झाले.

आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतच्या त्या नाजूक आणि भावूक करणाऱ्या आठवणी सांगितल्या. पण दीदींबद्दल बोलत असताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या बोलताना थांबल्या आणि त्यांना पाहून उपस्थित देखील भावूक झाले. 

'बाबा गेल्यानंतर अवघ्या 13 वर्षांची दीदी आमची बाबा झाली. माई गेली तेव्हा ती आमची आई झाली. दीदी गेल्यानंतर तुमच्यासाठी लता मंगेशकर गेल्या, आमच्यासाठी मात्र, आमचे सर्वस्वच गेले, असे सांगताना आशा भोसले यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

काही वेळ थांबत पुढे आशा भोसले म्हणाल्या,'मी दीदींपेक्षा चार वर्षांनी लहान होते. मी जणू तिची बाहुलीच होते. ती मला कडेवर फिरवायची. तिने माझ्यावर खूप प्रेम केले.'