मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chadda) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यासगळ्यात गेल्या काही दिवसांपासून ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा ट्रेंड चर्चेत असल्यानं स्वतः आमिरनेच यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. आता अभिनेत्री कंगना रणौतने या वादात सहभाग घेतला असून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ यामागे आमिरच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. 'आगामी हिंदी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’बाबत सध्या नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. पण यामागचा मास्टरमाइंड खुद्द आमिर खानच आहे. फक्त एक हिंदी विनोदी चित्रपट सोडला तर यावर्षी एकही हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. भारतीय संस्कृतीशी जोडले गेलेले दाक्षिणात्य चित्रपटच उत्तम कामगिरी करत आहेत', असं कंगना आपल्या पोस्टद्वारे स्पष्टपणे म्हणाली.
पुढे कंगना म्हणाली, 'हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला हिंदी चित्रपट यशस्वी कामगिरी करत नाही. प्रेक्षकांना काय पाहायला आवडतं हे सर्वप्रथम हिंदी चित्रपटसृष्टीनं समजून घेतलं पाहिजे. इथे हिंदू किंवा मुस्लिम असा काही संबंध येत नाही. आमिरने ‘पीके’ सारखा चित्रपट केला आणि आता देश असहिष्णु आहे असं त्याने म्हटलं. आमिर तू तुझ्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. पण चित्रपटांना एखादा धर्म किंवा त्याच्या विचारधारांशी जोडणं बंद कर.'
चित्रपटाबाबत होणारी नकारात्मक चर्चा ही आमिरमुळे आहे असं कंगनाचं स्पष्ट मत आहे. आता आमिर यावर प्रतिक्रिया देणार का? हे पाहावं लागेल. आमिरचा 'लाल सिंग चड्ढा’ बद्दल बोलायचं तर, हा टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ हॉलीवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.