Sampath J Ram Death : मनोरंजन विश्वातून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं आत्महत्या केली होती. त्यानंतर यश चोप्रा यांची पत्नी पॅमेला चोप्रा यांच्या निधनाच्या बातमीनंतर खळबळ उडाली होती. आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. कन्नड चित्रपटसृष्टतील प्रसिद्ध अभिनेता संपत जे. रामनं वयाच्या 35 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. तर त्याच्या निधनाचं कारण हे आत्महत्या असल्याचे म्हटले जात आहे.
संपत जे. राम हा कन्नड चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता आहे. मीडिया रिपोर्टनुसार संपत जे. रामनं 22 एप्रिल रोजी नेलमंगला येथील स्वतः च्या घरी आत्महत्या केली. याविषयी असेही म्हटले जात आहे की संपतला गेल्या काही दिवसांपासून काम मिळत नव्हतं. त्यामुळे संपत तनावात होता. काम मिळत नसल्यानं तो त्रासलेला होता. मात्र, या प्रकरणावर संपतच्या कुटुंबाकडून किंवा कोणत्या जवळच्या व्यक्तीकडून काहीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. संपतच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीला शोककळा पसरली आहे.
दरम्यान, संपतच्या पार्थिवावर कर्नाटकातील नेलमंगला येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. तर संपतच्या पार्थीवावर 23 एप्रिल रोजी त्याच्या घरी एनआर पुरा येथे अंत्यसंस्कार केल्याचं म्हटलं आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.
खरं सांगायचं झालं तर संपत जे. रामनं आत्महत्या करत स्वत: ला संपवलं आहे. 22 एप्रिल रोजी त्यानं नेल मंगला बंगळुरु येथे असलेल्या त्याच्या घरी आत्महत्या केली. रिपोर्ट्सनं दिलेल्या वृत्तानुसार, संपत जे. राम हा डिप्रेशनमध्ये होता. कारण त्याला चांगलं काम मिळत नव्हतं. त्यामुळेच त्यानं इतकं मोठं पाऊल उचलल्याचे म्हटले जाते.
संपत जे. रामनं ‘अग्निसाक्षी’ या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेतील त्याचा सहकलाकार विजय सूर्यानं ‘इटाइम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत संपतविषयी खुलासा केला आहे. विजय सूर्या म्हणाला, 'तो खूप दिवसांपासून एका चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होता.'
कोणत्याही कलाकारानं आत्महत्या करण्याची ही पहिली वेळ नाही. तर याआधी देखील अनेक कलाकारांनी आत्महत्या केली आहे. सगळ्यात आधी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतनं आत्महत्या केली होती. त्यानंतर एक कलाकार म्हणून प्रत्येत कलाकारावर किती तणाव असतो याची चर्चा सुरु झाली होती. तर काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा दत्तानं देखील आत्महत्या केली होती.