मुंबई : 'कौन बनेगा करोड़पती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाचं नाव घेताच काही गोष्टी आपोआपच समोर उभ्या राहतात. त्यापैकीच ओघाओघानं समोर येणारं नाव म्हणजे कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणाऱ्या अमिताभ बच्चन यांचं.
कित्येक वर्षांपासून बिग बी, केबीसीच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. पण, अशीही वेळ आली होती, जेव्हा बच्चन यांच्या भारदस्त आवाजाची उणिव या मंचाला भासू लागली होती. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी ही कमतरता भरुन काढण्यासाठी म्हणून अभिनेता शाहरुख खान याच्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली.
शाहरुखनं या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनावेळी अनेक नववीन प्रयोग केले. यामध्येच शोमधून पैसे जिंकणाऱ्या अनेकांना मिठी मारण्याचाही एक प्रयोग होता. मी हा खेळ सोडू इच्छितो, या ऐवजी शाहरुख मला तुम्हाला मिठी मारायची आहे, असं म्हणण्यासाठी स्पर्धकांना सांगण्यात आलं. या कार्यक्रमात अर्चना शर्मा नावाची एक स्पर्धक आली आणि तिनं अनेकदा शाहरुखचा पाणउतारा केला.
केबीसीचा खेळ अर्ध्यावरच सोडण्याचा उल्लेख करण्यात आल्याचं पाहून मला शाहरुखला मिठी मारण्याची काहीच हौस नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. पुढं शाहरुखनं अर्चना यांनी जिंकलेल्या रकमेचा चेक हा त्यांच्या आईकडे दिला, जेणेकरुन अर्चना यांना शाहरुखला मिठी मारायची नसली तरीही त्यांच्या आईला मात्र याच्याशी कोणतीही अडचण नव्हती. केबीसीमधील हा सर्वात वादग्रस्त भाग ठरला होता.