'हे आपले खरे संस्कार...', मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पासाठी किरण मानेंची खास पोस्ट

Kiran Mane Ganpati Special Post : किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पाविषयी सांगितलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 22, 2023, 01:30 PM IST
'हे आपले खरे संस्कार...', मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पासाठी किरण मानेंची खास पोस्ट title=
(Photo Credit : Social Media)

Kiran Mane Ganpati Special Post : आपल्या सगळ्यांचा आवडता सण गणेशोत्सव आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सव हा सण आपल्यासाठी दिवाळीसारखा असतो. तितकाच उत्साह आणि तितकाच आनंद... गणेशोत्सवात अनेक लोक त्यांच्या घरी गणपती बाप्पा यांना घेऊन येतात. त्यात सेलिब्रिटींच्या घरच्या गणपती तर नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता चर्चा ही एका सर्वसाधारण व्यक्तीच्या गणपतीची आहे. मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सर्वसामान्य व्यक्ती विषयी सांगितले आहे. खरंतर ही एक मुस्लिम व्यक्ती आहे. त्यामुळे किरन माने यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. 

किरण माने यांनी त्याच्या फेसबूक पोस्टवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक जोडपं आणि वृद्ध महिला बाप्पाचे दर्शन घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर त्याविषयी सांगत किरण माने म्हणाले, 'जनाब समीर हुसेन संदे या मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पाचा फोटो बघून खूप मस्त वाटलं भावांनो ! समीर भाई माझे फॅन असल्याचा अभिमान वाटला. कारण हे आहेत आपले खरे संस्कार... आणि हिच आहे आपल्या संविधानातली 'बंधुता'!

पुढे किरण माने म्हणाले की, 'रेठरे बुद्रूक गावातला आमचा समीरभाई म्हणजे कवीमनाचा संवेदनशील माणूस. ज्या भक्तीभावानं तो अल्लाहची इबादत करतो, तेवढीच अदब तो गणपतीची पूजा करतानाही ठेवतो. रमजानमध्ये रोजा ठेवण्यासोबतच नवरात्रीत उपास करनं हा देखील आपला 'कर्तव्य' मानतो. असा नादखुळा माणूस किती विवेक आणि निर्मळ, नितळ असेल मित्रांनो याचा विचार करा! ही संपूर्ण कुटुंबच खूप चांगल आहे. समीरभाईचे वडील पै. हुसेनभाई यांच्या जोपर्यन्त जीवात जीव होता... पाय साथ देत होते... तोपर्यंत किल्ले मच्छिन्द्रगडवरची मच्छिन्द्रनाथाची दर रविवारची पहाटेची आरती त्यांनी कधी चुकवली नाही! मला राहून-राहून वाटतं रेठरे बुद्रुक गावाला 'मानवता जपनारं लोभस गांव' म्हणून पुरस्कारच देऊन टाकावा. अहो, खरंच या गांवाचे एकेक किस्से म्हणजे द्वेषाचं विष पसरवू पाहणाऱ्यांना सन्नकन् कानशिलात लगावल्याप्रमाणे आहे. रेठऱ्याच्या जोतिबाची पालखी दरवर्षी दसऱ्याच्या जागराला निघते. या पालखीचा मान आज देखील मुस्लिम समाजाला आहे!  रेठऱ्यात रहिमतबुवा आणि पीर साहेब यांच्या दोन छोट्या दर्गा आहेत. तिथं हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेनं चादर चढवताना आणि दुवा मागताना दिसतात.

हेही वाचा : 'मी तिच्यासोबतच मेलो...', लेकीनं आत्महत्या केल्यानंतर दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्याची भावूक पोस्ट

पुढे किरण माने म्हणाले की 'याच रेठर्‍यातले गनीभाई, ज्यांना 'प्यारन भाभीचा गनी' म्हणायचे, ते एकतारी भजनातले 'नुसरत फतेह अली खान' होते. अशा खनखनीत आवाजात पांडुरंगाला साद घालायचे की साक्षात विठूराया भजनात येऊन नाचून जात असेल! त्यांचेच जिगरी दोस्त, रेठर्‍याचेच रामभाऊ सातपुते दरवर्षी न चुकता रमजानच्या महिन्यात रोजे धरत. रेठऱ्यात मानाचे तीन गणपती असतात. त्या गणपतींचे आगमन व पालखीचा मान 'नाभिक' समाजाला देण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अजून काय सांगू? आज माणसा-माणसात फूट पाडू पाहणार्‍या काळात, प्रेमाचा संदेश देणारं रेठरे बुद्रुक हे गाव महाराष्ट्रात आदर्श ठरावं असं आहे. रेठर्‍याच्या मातीतल्या माझ्या बांधवांना कळलंय, कृष्णामाईचं पानीही तहान भागवताना कधी भेदभाव करत नाही... आणि चौकातलं वडाचं झाडही सावली देताना जातधर्म बघून देत नाही. भेदाभेद आणि द्वेष हे रिकाम्या टाळक्यांनी उकरून काढलेले धंदे आहेत. त्यामुळेच अकबर इलाहाबादी म्हणायचा, "मजहबी बहस मैंने की ही नहीं, फालतू अक्ल मुझ में थी ही नहीं !' किरण माने यांची ही पोस्ट देखील सोशल मीडियावर तितकीच व्हायरल झाली आहे.