Atul Parchure Passes Away: मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन झालं आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केल्यानंतर अतुल परचुरे पुन्हा एकदा जोमाने काम करु लागले होते. पण सोमवारी रात्री त्यांचं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला असून, सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. अतुल परचुरे आपल्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. अनेक मुद्यांवर ते आपली मतं परखडपणे मांडत असत. त्यांनी मैत्रीबद्दल भाष्य केलेला असाच एक व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.
अतुल परचुरे यांनी संजय मोने यांच्या 'कानाला खडा' कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मित्रांची निवड करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत आपलं मत मांडलं होतं. त्यांचं हे म्हणणं लोकांनाही पटलं होतं. योग्य आणि परखड शब्दांत त्यांनी माडलेलं मत पटल्यानेच मुलाखतीमधील तो भाग व्हायरल झाला होता.
"आपण समोरच्यासाठी काय आहोत, किंवा समोरचा आपल्याला काय समजतो हे आपल्याला कळणं फार महत्त्वाचं असतं. त्यात गल्लत झाली तर फार गडबड होऊ शकते. तुम्ही समोरच्याला भयंकर जवळचा मित्र समजता. पण तो फक्त तुम्हाला टाईमपास समजतो. उपलब्ध असणं सद्गुण समजला जातो. त्याने फोन केला की तुम्ही त्याच्या समोर उपलब्ध आहात. तुम्ही काहीतरी मजेशीर बोलता, छान हसवता. पण जेव्हा त्याच्याकडे कोणासोबत वेळ घालवायचा हे निवडण्याची संधी असते किंवा मी कोणाला भेटावं याचा निर्णय घ्यायचा असतो. तेव्हा जेव्हा तो वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि तुम्हाला वेळ नाही सांगतो तेव्हा आपलं काहीतरी चुकतंय असं पटतं. समोरच्यासाठी आपण काय आहोत हेदेखील समजून घेणं महत्वाचं असते," असं अतुल परचुरे यांनी सांगितलं होतं.
अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केलं. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. याशिवाय 'जागो मोहन प्यारे' मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.