ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते.   

शिवराज यादव | Updated: Oct 14, 2024, 08:27 PM IST
ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन title=

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली होती.अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. 

अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केलं. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. याशिवाय 'जागो मोहन प्यारे' मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. 

अतुल परचुरे यांनी कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर चुकीच्या उपचारांमुळे आपलं आरोग्य आणखी बिघडल्याचं सांगितलं होतं. जेव्हा त्यांना कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे समजली तेव्हा ते डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी गेले पण सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली असं त्यांनी सांगितलं होतं. 

'पहिली सर्जरी चुकली आणि त्यानंतर सर्व चुकतच गेलं', अतुल परचुरेंनी सांगितली होती कॅन्सरची आठवण

अतुल परचुरे यांनी सांगितलं होतं की, "लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली तेव्हा ते पूर्णपणे बरे होते.  ते कुटुंबासह ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेले होते. काही दिवसांनी मला काहीही खायला त्रास होत होता आणि मळमळ होत होती. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. माझ्या भावाने मला काही औषधे दिली पण उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. मला समजले की काहीतरी चुकीचे आहे. डॉक्टरांनी सांगितले की माझ्या यकृतामध्ये सुमारे 5 सेंटीमीटरची गाठ आहे, तो कर्करोग आहे. मी बरा होईन की नाही असे विचारले, तो म्हणाला तू एकदम बरा होशील".
 
"उपचार सुरू झाले पण त्याचे विपरीत परिणाम होऊ लागले. चुकीच्या उपचारामुळे प्रकृती ढासळू लागली. प्रथमच योग्य निदान न जाल्याने माझ्या स्वादुपिंडावर विपरीत परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे माझी प्रकृती सतत खराब होत गेली. मला चालताही येत नव्हते आणि स्पष्ट बोलता येत नव्हतं. मग डॉक्टरांनी दीड महिना वाट पाहण्यास सांगितलं. शस्त्रक्रियेमुळे कावीळ आणि यकृतात पाणी भरण्याची भीती आहे, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो असंही सांगितलं. यानंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार केले," असा खुलासा त्यांनी केला होता.