वयाच्या ३४व्या वर्षी अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

अपघातानंतर काही तासांनीच.... 

Updated: Apr 29, 2020, 12:05 PM IST
वयाच्या ३४व्या वर्षी अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : 'मिस मिनी' ही भूमिका साकारत 'लिटील वुमन -अटलांटा'मधून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री आणि रिऍलिटी टेलिव्हिजन स्टार ऍश्ले रॉस हिने जगाचा निरोप घेतला आहे. एका कार अपघातामुळे जखमी असणाऱ्या ऍश्लेने अखेर सोमवारी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ती अवघ्या ३४ वर्षांची होती. 

सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी रात्री ऍश्लेच्या कारला अटलांटा येथे अपघात झाला. तिला तातडीने तेथील एका रुग्णालयात नेऊन उपचारही सुरु करणअयात आले. पण, अपघातानंतर काही तासांनीच तिचा मृत्यू झाला. 

ऍश्लेच्या टीमने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती देत एक पोस्ट करण्यात आली. ‘Little Women‘च्या ट्विटर अकाऊंटवरुनही ऍश्लेच्या निधनाचं दु:ख व्यक्त करण्यात आलं. तिला श्रद्धांजलीही वाहण्यात आली. 

 

'ही अतिशय धक्कादायक बातमी ऐकून ‘Little Women‘च्या पूर्ण कुटुंबालाच हादरा बसला आहे. आमच्या लाडक्या 'मिस मिनी'च्या जाण्याने अतीव दु:ख झालं आहे. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही तिचं कुटुंब आणि तिच्या मित्रपरिवारासोबत आहोत', असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं. अतिशय कमी वयात जगाचा निरोप घेणाऱ्या या अभिनेत्रीच्या पश्चात तिची आई, आजी आणि इतर काही सदस्यांचा परिवार आहे.