'बाहुबली' फेम तमन्ना भाटीयावर बूट भिरकावला, आरोपी ताब्यात

बहुचर्चित 'बाहुबली २' या सिनेमाने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स केले. इतकेच नाही तर हजारो कोटींचा गल्लाही जमवला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 28, 2018, 11:30 PM IST
'बाहुबली' फेम तमन्ना भाटीयावर बूट भिरकावला, आरोपी ताब्यात
Image: @tamannaahspeaks/Twitter

नवी दिल्ली : बहुचर्चित 'बाहुबली २' या सिनेमाने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स केले. इतकेच नाही तर हजारो कोटींचा गल्लाही जमवला.

एका कार्यक्रमा दरम्यान घडला प्रकार

'बाहुबली २' या सिनेमात भूमिका केलेल्या अभिनेत्री तमन्ना भाटियाला रविवारी एका विचित्र घटनेचा सामना करावा लागला. एका कार्यक्रमा दरम्यान अभिनेत्री तमन्नावर बूट फेकण्यात आला.

ज्वेलरी शॉपच्या उद्घाटना दरम्यान बूट फेक

हैदराबादमधील हिमायतनगर परिसरात एका ज्वेलरी शॉपचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचलेल्या तमन्नावर बूट फेकण्यात आला.

गर्दीतून फेकण्यात आलेला बूट ज्वेलरी शॉपच्या कर्मचाऱ्याला लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनिअर असलेल्या करीमुल्लाहने तमन्नावर बूट फेकला. आरोपी करीमुल्लाह हा मुशीराबाद येथील निवासी आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

नारायणगुडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी रविंद्र यांनी सांगितले की, "या घटनेनंतर करीमुल्लाह याला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की तमन्नाने सिनेमात केलेल्या भूमिकांमुळे तो नाराज होता".

ज्वेलरी शॉपच्या कर्मचाऱ्याला बूट लागल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तमन्नाने हिंदी, तेलुगू आणि तमिळ सिनेमांत भूमिका केली आहे.