'तान्हाजी' नंतर आता बाजी प्रभूंच्या आयुष्यावर आधारित 'पावनखिंड' सिनेमा

बाजी प्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित पावनखिंड हा सिनेमा आगामी वर्षात आपल्या भेटीला येणार आहे.

Updated: Dec 10, 2019, 10:41 PM IST
'तान्हाजी' नंतर आता बाजी प्रभूंच्या आयुष्यावर आधारित 'पावनखिंड' सिनेमा

मुंबई : सध्या सिनेचाहत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा मल्टी स्टारर अपकमिंग सिनेमा 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' ची चर्चा आहे. पण येत्या २०२० या वर्षात आणखी एका शूरवीराची महती आपल्यासमोर येणार आहे. बाजी प्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित पावनखिंड हा सिनेमा आगामी वर्षात आपल्या भेटीला येणार आहे. '...आणि काशिनाथ घाणेकर' सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचे पोस्टर रिलीज करुन ही गोड बातमी दिली आहे. त्यामुळे आता इतिहासप्रेमींमध्ये या सिनेमाबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे. 

'तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला'...कथा त्या एका रात्रीची जिने मराठेशाहीचा इतिहास बदलून टाकला...ही कथा आहे बाजी प्रभू देशपांडेंची- आपल्या आयुष्याचा प्रवास मावळतीकडे सुरु झालेला असताना, स्वराज्याच्या उगवत्या सुर्याला- वीर शिवाजीला, त्यांनी दिलेल्या प्राणांच्या अर्घ्याची....अशी एक फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. 

श्री गणेश मार्केटींग एण्ड फिल्म्स आणि डार्क प्रिन्स पिक्चर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या वर्षात दिवाळीमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.