मुंबई : मोस्ट अवेटेड मराठी सिनेमा ज्याने इतिहास रचला त्या सिनेमाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिक्वल सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीला पडत नाहीत हे विधान साफ चुकीचं ठरणारा मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा 3 भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे.
‘मुंबई पुणे मुंबई-१’ हा सिनेमा बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ दोन वर्षांपूर्वी आला. इतिहास रचलेल्या या सिनेमाचा आता तिसरा भाग डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेच्या हिट सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. हा सिनेा 7 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होत आहे.
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “मुंबई पुणे मुंबई’ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत.”