Viral Video: प्रचार रॅलीत चिडलेल्या महिलेवर सदा सरवणकरांंच्या मुलाचे गंभीर आरोप

Samadhan Sada Sarvankar Post: आज कोळीवाड्यातील प्रचारावेळी सदा सरवणकर यांना एका महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 11, 2024, 08:56 PM IST
Viral Video: प्रचार रॅलीत चिडलेल्या महिलेवर सदा सरवणकरांंच्या मुलाचे गंभीर आरोप title=
सदा सरवणकर

Samadhan Sada Sarvankar Post: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या सर्वात माहिम विधानसभा मतदार सध्या चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत आणि मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांच्यात ही लढत होणार आहे. आधीच उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, त्यात राज ठाकरेंनी भेट नाकारली अशा घटना सदा सरवणकर यांच्यासोबत घडत गेल्या. त्यात आज कोळीवाड्यातील प्रचारावेळी त्यांना एका महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला. यात त्या महिलेने सदा सरवणकरांवर काम न केल्याचे आरोप केले. याचा व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियात व्हायरल झाला. यानंतर आता सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी त्या महिलेला प्रत्युत्तर दिले आहे.  

काय आहे नेमकं प्रकरण?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे माहीम कोळीवाड्यात प्रचाराला घरोघरी पोहोचत होते. सदा सरवणकर एका महिलेच्या घरासमोर पोहोचले असता तिने त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. कोळी बांधव वर्षानुवर्षे लावत असलेले स्टॉल बंद का केले? असा प्रश्न तिने विचारला. महिलेचा रोष पाहून सदा सरवणकर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथून निघून जाणे योग्य समजले. हा व्हिडीओ सदा सरवणकरांच्या विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय. त्याला आता समाधान सरवणकर यांनी उत्तर दिलंय. 

महिलेचे प्रत्युतर

तिथे बचत गटाचे स्टॉल होते. पोळी संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवावी हा उद्देश आहे. आम्ही चांगला व्यवसाय करत होतो. पण यांनी हा व्यवसाय बंद पाडला. पण माझ्यावर दारु विक्रीचा खोटा आरोप करण्यात आला.मी दारु विकत असल्याचे पुरावे द्या. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे संबंधित महिलेने म्हटले आहे. ही बदनामी मी खपवून घेणार नाही. एका महिलेने मला तिची रुम नावावर केली होती. त्यानंतर तिने रुम मागितली. तेव्हा मी केलेला खर्च मागितला. त्यांनी खर्च दिला. त्यानंतर हे प्रकरण मिटलं होतं. सदा सरवणकरांना हे प्रकरण माहिती होतं, असे या महिलेने म्हटले आहे. मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झालं तर सदा सरवणकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असेल, असे क्षमा नाईक यांनी म्हटले.

काय म्हणाले समाधान सरवणकर?

माहीम मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची महिला पदाधिकारी फ्लूड प्लाझाच्या नावावर दारूचा अड्डा चालवत होती. तिच्याविरोधात महापालिकेत तक्रार आली. यानंतर ते स्टॉल महापालिकेने बंद केले. तिथे दारुची विक्री सुरु असायची. कोळी बांधवांनी या महिलेची तक्रार केली होती. यानंतर तिचा व्यवसाय बंद झाला. तिने सुरु केलेली दारुची भट्टी बंद झाली, असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला. या महिला हफ्ते घेण्याचे काम करतात. या महिला ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत.  म्हणून आज त्यांनी प्रचारादरम्यान वाद घालण्याचा प्रयत्न केल्याचे सरवणकर म्हणाले. याच महिलेने  काही महिन्यांआधी एका 70 वर्षाच्या महिलेचे घर हडपले होते, असा दुसरा आरोपदेखील त्यांनी या महिलेवर केलाय.