मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. कलाकार देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या सेटवर देखील कोरोना ग्रस्तांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मालिकेच्या सेटवर तब्बल 110 लोकांची RT-PCR चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये 4 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
दरम्यान, मुंबईत चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. अशात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी चित्रीकरणासाठी बाहेर जायचं की नाही याबद्दल देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
मालिकेच्या सेटवर 4 कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर अनिस मोदी म्हणाले, 'चित्रीकरणासाठी बाहेर जाण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. कारण काही दिवसांपूर्वी आलेल्या गाईडलाईन्सनुसार चित्रीकरण थांबेल असं वाटलं नव्हतं. सेटवर RT-PCR चाचणी केल्यानंतर 4 जणांना कोरोना झाल्याचं कळालं. त्यांना आता क्वारंटाईन करण्यात आलं आहे.'
'पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये कलाकार आणि प्रॉडक्शनच्या लोकांचा समावेश आहे. जे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत त्यांना घरीच राहण्याचं सांगण्यात आलं आहे.' असं देखील मोदी म्हणाले. मालिकेत गोली ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या आणि प्रॉडक्शनच्या काही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबईच्या बाहेर चित्रीकरण होईल?
यावर मोदी म्हणाले, 'आम्ही अद्याप असा निर्णय घेतलेला नाही. कलाकार आणि प्रॉडक्शनच्या सहमतीने निर्णय घेतला जाईल. सेटवरील लोकांची सेफ्टी जास्त महत्त्वाची आहे. आमच्याकडे एक आठवड्याचे भाग आहेत. त्यानंतर निर्णय घेवू.' असं मोदी म्हणाले.