मुंबई : पहिल्याच सिनेमातून पदार्पण करत आपल्या सौंदर्यामुळे थेट प्रेक्षकांच्या काळजात घर करणारी अभिनेत्री मयुरी कांगो हीनं आपल्या कामाची दखल घ्यायला लोकांना भाग पाडलंय. 'ब्रेन विथ ब्युटी' असलेली मयुरी कांगो हिनं नुकतंच गूगल इंडियात एजन्सी पार्टनरशीपची उद्योग प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारलीय. मयुरीला १९९६ मध्ये आलेल्या 'पापा कहते हैं'पासून बॉलिवूडमध्ये नवी ओळख मिळाली होती. मयुरीच्या अधिकृत लिंक्डइन प्रोफाईलनुसार मार्च २०१९ पासून ती गूगल इंडियामध्ये दाखल झालीय.
गूगलाचा एक भाग बनून मी अत्यंत उत्साहीत आहे. जवळपास गेल्या दशकभराच्या अनुभवासहीत मी हे काम पुढे घेऊन जायला तयार आहे. एका अनुभवी टीमचा एक भाग बनण्याची ही दमदार संधी आहे... मी माझ्या व्यावसायिक आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी उत्साहीत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मयुरीनं व्यक्त केलीय.
मयुरी कांगो यापूर्वी एका 'परफॉर्मिक्स' या मार्केटींग एजन्सीसोबत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होती. तसंच तिनं 'डिजिटास'मध्ये मीडिया सहाय्यक संचालक आणि 'जेनिथ'मध्ये मुख्य डिजिटल अधिकारी म्हणून काम केलंय.
१९९५ मध्ये बाबरी मस्जिदच्या मुद्द्यावर आधारीत सिनेमा 'नसीम' या सिनेमातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. परंतु, तिला खरी ओळख मिळाली ती महेश भट्ट यांच्या 'पापा कहते हैं' या सिनेमातून... या सिनेमात तिनं जुगल हंसराजसोबत काम केलं होतं.
मयुरीनं बेताबी, होगी प्यार की जीत, बादल या सिनेमांतही काम केलं. तसंच छोट्या पडद्यावरच्या कही किसी रोज, किटी पार्टी, कुसुम तसंच क्या हादसा क्या हकीकत यांसारख्या कार्यक्रमांतही ती झळकली होती.