close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कोट्यवधींचं मानधन धुडकावत अभिनेत्रीचा फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीला नकार

जाणून घ्या त्यामागचं कारण 

Updated: Apr 21, 2019, 11:08 AM IST
कोट्यवधींचं मानधन धुडकावत अभिनेत्रीचा फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीला नकार
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये सर्रास सेलिब्रिटींचे चेहरे झळकतात. अर्थात त्यातील किती सेलिब्रिटी ती सौंदर्य प्रसाधनं वापरतात हा प्रश्न बऱ्याच अंशी अनुत्तरित आहे. पण, सध्याच्या घडीला एका अभिनेत्रीने त्वचा उजळण्याच्या अर्थात फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीला नकार दिल्याचं वृत्त समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या क्रिमच्या जाहिरातीसाठी अभिनेत्रीला तब्बल दोन कोटी रुपये इतकं मानधन देण्यात येणार होतं. पण, तिने हा प्रस्ताव नाकारला. आपल्या तत्वांच्या बळावर ही जाहिरात नाकारणारी अभिनेत्री आहे साई पल्लवी. 

दाक्षिणात्य विशेषत: मल्याळम चित्रपटविश्वात नावाजलेल्या साई पल्लवी हिच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. साई स्वत: फार कमी प्रमाणात सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असल्यामुळे तिने जाहिरातीचा हा प्रस्ताव नाकारल्याचं कळत आहे. किंबहुना चित्रपटांमध्येही कमीत कमी मेक-अप करण्यासाठी म्हणूनही ती ओळखली जाते. मुळात आपली त्वचा आणि रंगाचा पोत आहे तसाच सादर करण्याला तिने आधीपासूनच प्राधान्य दिलं आहे. त्यामुले ही जाहिरात नाकारणं तिच्यासाठी फारसं कठीण नव्हतं.

 
 
 
 

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai) on

'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार खुद्द साईनेच याविषयी माहिती दिली होती. 'मी स्वत: सौंदर्य प्रसाधनांना पाठीशी घालत नाही.  तुम्ही स्वत:विषयी, त्वचेच्या रंगाविषयी आत्मविश्वास बाळगलाच पाहिजे', असं तिचं ठाम मत आहे. त्यामुळे तिचा हा अंदाज हा अनेकांसाठी प्रेरणादायी आणि तितकाच प्रशंसनीय आहे असं म्हणायला हरकत नाही. 

दाक्षिणात्य चित्रपट विश्वात साई पल्लवी हे नाव अनेकांच्याच पसंतीचं आहे. २०१५ मध्ये 'प्रेमम मलरे' या मल्याळम चित्रपटातून तिने अभिनयविस्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली. 'अथिरन', 'मारी २' या चित्रपटांनीही तिच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी दिली. ती अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. चित्रपट आणि सोशल मीडिया पोस्ट पाहता याचा अनेकदा प्रत्यतही आला आहे.