Tik Tokच्या 'मधुबाला'ला बॉलिवूडची लॉटरी?

सुप्रसिद्ध दिग्दर्शकासोबत काम करण्याची तिला संधी मिळण्याचं चित्र दिसत आहे. 

Updated: Nov 15, 2019, 04:09 PM IST
Tik Tokच्या 'मधुबाला'ला बॉलिवूडची लॉटरी?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वी Tik Tok या ऍपचं वेड सर्वत्र पाहायला मिळत होतं. आजही या ऍपची लोकप्रियता कायम आहे. अशाच या ऍपच्या माध्यमातून एक चेहरा समोर आला होता. मुख्य म्हणजे हा चेहरा Tik Tokवर मधुबाला म्हणून अनेकांचं लक्ष वेधत होतं. 

प्रियांका कंडवाल नामक ही अभिनेत्री सोशल मीडियावर Tik Tokची मधुबाला म्हणून ओळखली जाऊ लागली. मधुबाला यांच्यासारखं दिसणं, त्यांच्यासारखेच हावभाव करणं हे सारंकाही प्रियांकाने असंकाही निभावून नेलं की क्षणार्धासाठी खुद्द मधुबालाच आपल्यात असल्याची अनुभूती अनेकांना झाली. 

सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीझोतात आलेल्या या प्रियांकाला आता थेट बॉलिवूडचं तिकीट मिळण्याची चर्चा आहे. चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली हा दिवंगत हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटासाठीचे अधिकृत अधिकारही त्याला मिळाले आहेत. सध्याच्या घडीला या चित्रपचटाच्याचर्चा अगदी प्राथमिक स्तरावर आहेत. 

असं असलं तरीही चित्रपटाविषयीचं कुतूहल मात्र आतापासूनच अनेकांच्या मनात घर करु लागलं आहे. मधुबाला यांच्या कलाविश्वातील पदार्पणापासून त्यांच्या खासगी आयुष्यापर्यंत आणि आजारपणापर्यंत अनेक गोष्टींवर चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याचं कळत आहे. या चित्रपटामध्ये मधुबाला यांची  भूमिका साकारण्यासाठी Tik Tok फेम प्रियांका कंडवाल हिचंच नाव समोर येत आहे. तिला ही संधी मिळाल्यास संधीचं सोनं करण्यात प्रियांका यशस्वी ठरते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.