दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनसह 'पुष्पा' चित्रपटात झळकलेला अभिनेता जगदीश प्रताप भंडारी याला अटक करण्यात आली आहे. पुष्पा चित्रपटात त्याने अल्लू अर्जूनच्या खास मित्राची भूमिका निभावली होती. ज्युनिअर महिला कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
'पुष्पा' चित्रपटात झळकलेला जगदीश प्रताप भंडारी याच्याविरोधात पंजगुट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर 6 डिसेंबरला पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. ज्युनिअर आर्टिस्टचे फोटो काढल्याप्रकरणी आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
पीडित महिला कलाकार पंजगुट्टा परिसरात वास्तव्यास होती. 29 डिसेंबरला तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी चौकशी केली असताना जगदीश याने केलेल्या मानसिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचं उघड झालं.
27 नोव्हेंबरला पीडित महिला जगदीशसोबत होती. यावेळी त्याने तिच्या नकळत तिचे फोटो काढले होते. यानंतर त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली होती. मी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करेन असं तो धमकावत होता. यामुळे महिला फार तणावात होते. अखेर याच तणावातून तिने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जगदीशविरोधात पंजगुट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून जगदीश फरार होता. अखेर बुधवारी त्याला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आलं असता, न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. दरम्यान जगदीशला अटक केल्यानंतर 'पुष्पा 2' चं शुटिंग थांबलं आहे का याबाबत माहिती समोर आलेली नाही.
जगदीश प्रताप बंदरीने 2019 मध्ये 'मल्लेशम' चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला समीक्षकांनी पसंती दिली होती. याशिवाय अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' मधील केशवच्या भूमिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली होती. तो सध्या पुष्पा चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करत आहे. याशिवाय त्याच्याकडे 'चिवराकू मिगिलेधी' आणि 'पिकपॉकेट 2: द मर्डर प्लॅन' हे चित्रपटही आहेत.