मुंबई: हिंसा हे कोणत्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही, असे विधान दक्षिणेतील सुपरस्टार आणि रजनी मक्कल मंद्रम पक्षाचे सर्वेसर्वा रजनीकांत यांनी केले आहे. देशभरात CAA आणि NCR विरोधात सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी गुरुवारी रात्री हे ट्विट केले. या ट्विटमध्ये रजनीकांत यांनी म्हटले आहे की, हिंसा हे समस्येचे उत्तर असू शकत नाही. संकटाच्या काळात सर्वांनीच सजग आणि सावध राहणे गरजेचे आहे. देशभरात होणाऱ्या हिंसाचाराने माझे मन व्यथित झाले आहे, असे रजनीकांत यांनी म्हटले होते.
रजनीकांत यांच्या या ट्विटचे अनेकांनी समर्थन केले आहे. त्यामुळे आज सकाळपासून ट्विटरवर #IStandWithRajnikanth ट्रेंडमध्ये आहे.
तत्पूर्वी गुरुवारी देशभरात अनेक ठिकाणी नागरिकांनी CAA आणि NCR विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबईतही हजारोंच्या संख्येने आलेल्या निदर्शकांनी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या आंदोलनात ज्येष्ठ समाजवादी नेते जी. जी. पारिख, सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड, आनंद पटवर्धन, सुधींद्र कुलकर्णी, राज बब्बर, हुसेन दलवाई, मिलींद देवरा यांच्यासह अभिनेता फरहान अख्तर, राकेश ओमप्रकाश मेहरा, अभिनेत्री स्वरा भास्कर, सुशांत सिंग, सईद मिर्झा यांनीही या आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेवर आंदोलनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्लीची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने जंगी सभा आयोजित केली आहे. मोदींची ही सभा निवडणूक प्रचाराची सुरुवात मानली जात आहे.