जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. जोधपूरच्या न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. या निकालानंतर सलमान खान जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना झाला आहे. याच जेलमध्ये लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आसाराम बापूही आहे. आसाराम बापूच्या शेजारीच सलमान खानला ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मागील वेळेस जेव्हा सलमान खानला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा त्याला बरॅक नंबर १ मध्ये ठेवण्यात आले. तेथे सलमान पाच दिवस होता. तेव्हा त्याचा कैदी क्रमांक ३४३ होता.
खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावूक झाला होता.
सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहीण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.
दरम्यान, सैफअली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आज सकाळी न्यायालयात पोहोचल्यावर सलमान खानने न्यायालयरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभे राहून निर्दोष असल्याचे म्हटले. आरोपींपैकी सर्वात आधी सलमान खान न्यायालयात पोहोचला होता.
१९९९ साली हम साथ साथ है चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना काळविटाची शिकार करण्यात आली होती.