'तुझ्यात जीव रंगला'मधून लोकप्रिय कलाकाराची एक्झिट

काही कलाकार हे त्यांच्या भूमिकांमुळे इतके लोकप्रिय होतात की... 

Updated: Oct 27, 2019, 02:59 PM IST
'तुझ्यात जीव रंगला'मधून लोकप्रिय कलाकाराची एक्झिट

मुंबई : काही कलाकार हे त्यांच्या भूमिकांमुळे इतके लोकप्रिय होतात की, प्रेक्षकांच्या कुटुंबातीलच एक भाग होऊन जातात. मालिका विश्वात अशीच ओळख प्रस्थापित करणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील 'नंदिता' किंवा 'वहिनी साहेब' अशीच तिची ओळख. 

मालिकेच्या सुरुवातीपासूनच तिचा खलनायकी अंदाज आणि भूमिकेत असणारा ठसका या मालिकेला आणखी रंजक ठरवत होता. अशी ही धनश्री आणि तिने साकारलेलं पात्र यापुढे मालिकेत दिसणार नसल्याचं तिची सोशल मीडिया पोस्ट वाचून लक्षात येत आहे. 

लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी धनश्री आणि तिची ही मालिका या दोघांच्याही लोकप्रियतेविषयी सांगण्याची काहीच गरज नाही. अशा या भूमिकेप्रती असणारी आत्मियता आणि प्रेम धनश्रीने लिहिलेल्या पोस्टमध्ये वाचायला मिळालं. 

'अखेरचा दिवस.... अखेरचं दृश्य...., तुमच्या मनाशी जोडल्या गेलेल्या कोणत्याही गोष्टीपासूनचा दुरावा सहजासहजी स्वीकारला जात नाही. २०१६ मध्ये सुरु झालेला हा प्रवास आज संपत आहे', असं लिहित चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी तिने जागवल्या. नंदिता किंवा वहिनीसाहेब या पात्राच्या आपण प्रेमात पडल्याचं सांगत आपल्याला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळेल अशी कल्पनाच नव्हती असंही तिने या पोस्टमधून म्हटलं. बरं निरोपाची ही पोस्ट इथेच संपनी नसून, यापुढेही आभार मानण्याचं सत्र सुरुच असेल असंही ती म्हणाली. 

'नंदिता' साकारणाऱ्या धनश्रीची पोस्ट पाहून चाहत्यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोणी तिच्या भूमिकेची प्रशंसा केली, तर आता पुढे ती मालिकेचा भाग नसल्याची खंतही व्यक्त केली. एका कलाकारासाठी हीच त्याच्या कलेची पोचपावती आहे असं म्हणायला हरकत नाही.