नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने संपूर्ण देशाला झटका लागला. तमिळ, मल्याळम, तेलगू, हिंदी, कन्नड भाषांमध्ये ५ दशकं काम करणारी लेडी सुपरस्टार श्रीदेवीने २४ फेब्रुवारीला दुबईत अखेरचा श्वास घेतला. त्या ५४ वर्षांच्या होत्या.
लग्नसोहळ्यासाठी श्रीदेवी दुबईला रवाना झाली होती. ज्या हॉटेलमध्ये तिचे वास्तव्य होते तिथल्याच रुमच्या बाथरूममध्ये तिचे पती बोनी कपूर यांनी ती मृताव्यस्थेत आढळली.
त्यानंतर वाऱ्यासारख्या बातम्या पसरल्या आणि ठिकठिकाणाहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीदेवींचे चाहते तर हळहळलेच पण बॉलिवूडकरांवरही दुःखाचा डोंगर कोसळला.
पण श्रीदेवींच्या अचानक जाण्याने मात्र त्यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली. मुलगी जान्हवीबद्दलचे त्यांचे स्वप्न अधूरे राहिले. जान्हवी लवकरच धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. मात्र ती सिनेमात येण्यापूर्वी तिचे लग्न व्हावे व नववधूच्या वेशात तिला बघावे, अशी त्यांची इच्छा होती. जान्हवीचे बॉलिवूडमध्ये येणे त्यांना फारसे रुचले नव्हते.
एका मुलाखतीत श्रीदेवींनी सांगितले की, जान्हवीला सिनेमात काम करण्याची इच्छा आहे आणि तिच्या आनंदासाठी मी तयार झाले आहे. पण मला वाटते की त्यापूर्वी तिचे लग्न व्हावे. प्रत्येक आईप्रमाणे माझेही स्वप्न आहे की, तिने संसार थाटावा आणि आनंदी रहावे. त्यानंतर तिला हवे ते तिने करावे. तिच्या करिअरमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
मात्र मुलीला नववधूच्या रुपात पाहण्याचे श्रीदेवींचे स्वप्न अपूर्णच राहिले. आपल्या सर्वांना चटका लावून श्रीदेवी आपल्यातून निघून गेल्या. जान्हवीसाठीही त्यातून बाहेर पडणे कठीण असणार आहे.