पॅरिस - नेहमीच वादात असणारा अमेरिकन गायक क्रिस ब्राउन याला फ्रान्समध्ये पॅरिस पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. एका २४ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप असल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. तरूणीने फ्रान्स पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर क्रिसला ताब्यात घेण्यात आले होते. परंतु, बलात्काराच्या आरोपानंतर झालेल्या चौकशीअंती त्याची सुटका करण्यात आल्याचे फ्रान्स पोलिसानी सांगितले आहे.
१५ जानेवारी रोजी क्रिसने तरूणीला हॉटेलमधील रूममध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरूणीने केला होता. या आरोपांमुळे क्रिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांकडून झालेल्या सुटकेनंतर क्रिसने सोशल मीडियावरून चुकीच्या पद्धतीने केलेल्या आरोपांचे खंडण केले आहे.
दरम्यान, क्रिस कायदेशीररित्या अडकल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही त्याच्यावर रितसर परवानगीशिवाय घरात माकड पाळल्याप्रकरणीही आरोप लावण्यात आले होते. एक्स गर्लफ्रेंड रिहाना हिला मारहाण केल्याप्रकरणी २००५ साली त्याला ५ वर्षांच्या कारावासची शिक्षा तसेच १८० दिवसांच्या सामुदायिक सेवेची शिक्षाही देण्यात आली होती. ७ वर्षांपूर्वी क्रिसला प्राणघातक शस्त्राने एका व्यक्तीवर हल्ला केल्याच्या संशयावरूनही अटक करण्यात आली होती.