Rahul Deshpande Amaltash Movie Trailer : राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या आवाजाचे असंख्य चाहते आहेत. राहुल यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचे श्रोते आवर्जुन उपस्थित राहतात. राहुल देशपांडे यांच्या गाण्याप्रमाणेच त्यांच्या अभिनयानेही प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. राहुल देशपांडे यांचा 'मी वसंतराव' हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा राहुल देशपांडे मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
राहुल देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेला 'अमलताश' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट असणार आहे. या चित्रपटाची कथा संगीतातूनच पुढे जाताना दिसणार आहे. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यात एक परदेशी मुलगी येते. त्या मुलीला संगीताची आवड असते. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचे 'त्या' कॅनेडिअन मुलीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार, हे चित्रपटातूनच उलगडणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक सुहास देसले यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. "हल्ली चित्रपटाचे वेबसीरिज मध्ये रूपांतर होते. मात्र इथे उलट झाले आहे. व्हिडीओ ब्लॉग म्हणून सुरु झालेला हा आमचा प्रवास पडद्यावर चित्रपटरूपात झळकणार आहे. राहुलनेच हे सर्व सुरू केले आणि त्यामुळे आपोआपच ते संगीतमय चित्रपटरूपात प्रकट झाले. आम्ही निवडलेले सगळे कलाकार हे मुळात संगीतकार आहेत आणि चित्रपटात वापरलेली सर्व गाणीही सेटवर थेट रेकॉर्ड केली आहेत. आपण आपल्या प्रामाणिक भावना संगीतातून व्यक्त करू शकतो, त्यामुळे शक्य होईल तितके संगीत व्यक्त करणे, हा चित्रपटामागचा विचार होता", असे सुहास देसले म्हणाले.
"आमच्याकडे चित्रपटाची कथा नव्हतीच. आम्ही संगीत आणि पात्रांच्या जीवनावर यात भाष्य केले आहे आणि हाच चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचा वाटेल कारण यातील पात्र तुम्हाला आपल्यातीलच भासतील. एखाद्या प्रियजनासारखी ही पात्रे तुमच्याशी बोलतील. आमचे चित्रीकरण हे पुण्यात झाले आहे. खूप तरल विचार करून पुणे न्याहाळले तर पुणे शहर हे एखाद्या कवितेसारखेच भासेल. अमलताश, बहावा, वर्षातून एकदाच फुलतो, आपले जीवन समृद्ध करतो आणि आनंदी निरोप देतो, आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रत्येकासाठी असेल", असेही सुहास देसलेंनी यावेळी सांगितले.
दरम्यान जीवनाच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण दाखवणाऱ्या 'अमलताश' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुहास देसले यांनी केले आहे. या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात राहुल देशपांडे हे एका वेगळ्याच अंदाजात झळकणार आहेत. मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे. हा चित्रपट 8 मार्च 2024 ला प्रदर्शित होणार आहे.