TMKOC च्या प्रसिद्ध कलाकाराने 34 दिवसांपासून खाल्लं नाही पोटभर जेवण, डोक्यावर 1.2 कोटींचं कर्ज,

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. एका कलाकाराने पहिल्यांदा मांडली व्यथा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 12, 2024, 05:17 PM IST
TMKOC च्या प्रसिद्ध कलाकाराने 34 दिवसांपासून खाल्लं नाही पोटभर जेवण, डोक्यावर 1.2 कोटींचं कर्ज, title=

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये रोशन सिंग सोधीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला गुरचरण सिंग एप्रिलमध्ये एक महिन्यासाठी बेपत्ता होता. 25 दिवसांनी तो घरी परतला होता. गुरुचरण सिंगसोबत नक्की काय झालं, याची कल्पना कुणालाच नव्हती. पहिल्यांदा सांगितला धक्कादायक प्रकार. 

सुमारे 25 दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेले सोधी म्हणजेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे गुरुचरण सिंग घरी परतले आहेत, पण त्यांच्या आयुष्यातील संकटे काही संपण्याच नाव घेत नाहीत. अभिनेता आर्थिक संकटाशी झुंजत होता. आणि याच्याच तणावामुळे त्याने घर सोडल्याची चर्चा सगळीकडे होत होती. पण पहिल्यांदा गुरुचरण यांनी आपल्यासोबत नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. 1.2 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे त्याने सांगितले आहे. गेल्या एक महिन्यापासून मुंबईत काम मिळवण्यासाठी घरोघरी भटकत असल्याचे अभिनेत्याने सांगितले.

सिद्धार्थ कन्नन यांच्याशी गप्पा मारताना गुरुचरण सिंग यांनी त्यांच्या सर्व वेदना मोकळेपणाने सांगितल्या आणि म्हणाले, 'मी कामाच्या शोधात एक महिना मुंबईत आहे. मला वाटते की, लोक माझ्यावर प्रेम करतात आणि त्यांना मला पाहायचे आहे. मला माझ्या खर्चासाठी, माझ्या आईची काळजी घेण्यासाठी आणि माझे कर्ज फेडण्यासाठी पैसे कमवायचे आहेत. मला काही चांगले काम करून माझी दुसरी इनिंग सुरू करायची आहे. मला यावेळी पैशांची खूप गरज आहे कारण मला ईएमआय आणि क्रेडिट कार्डची बिले देखील भरावी लागतात. मला पैशांची गरज आहे, जरी काही चांगले लोक आहेत जे मला पैसे देतात पण मला काम करायचे आहे. कारण मला माझ्या वृद्ध आईवडिलांची देखील काळजी घ्यायची आहे.

महिन्याभरापासून खाल्ल नाही पोटभर जेवण

गुरुचरण सिंह म्हणाला की, एका महिन्यापेक्षा जास्त काळ पोटभर जेवलेला नाही. ते म्हणाले, 'गेल्या 34 दिवसांपासून मी जेवलेलोच नाही. मी दूध, चहा आणि नारळपाणी असा द्रव आहार घेत आहे. गेल्या चार वर्षांत मी फक्त अपयशच पाहिले आहे. मी वेगवेगळ्या गोष्टी, व्यवसाय आणि प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न केला पण काहीही यश मिळाले नाही. आता मी थकलो आहे आणि आता मला काहीतरी कमवायचे आहे.

माझ्यावर 1.2 करोडचं कर्ज 

आपल्या कर्जाबद्दल बोलताना सिंग म्हणाले, 'माझ्यावर खूप कर्ज आहे. मला बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांचे 60 लाख रुपयांचे कर्ज फेडायचे आहे. याशिवाय माझ्या काही चांगल्या ओळखीच्या लोकांनी मला पैसे दिले आहेत आणि त्यांचे कर्जही मला फेडायचे आहे. एकूण माझे संपूर्ण कर्ज सुमारे 1.2 कोटी रुपये आहे.

आध्यात्मिक यात्रेवर 

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सिंग म्हणाले होते की, त्यांनी आध्यात्मिक प्रवास सुरू केला आहे. ते म्हणाले होते, 'मी कर्जात बुडालो किंवा कर्ज फेडू शकलो नाही म्हणून मी गायब झालो नाही. माझ्यावर अजून कर्ज आहे. माझे हेतू चांगले आहेत आणि मी अजूनही माझे क्रेडिट कार्ड आणि ईएमआय भरत आहे.