मुंबई : अजय देवगणच्या 'तान्हाजी' (Tanhaji)सिनेमाची जोरदार चर्चा होत असताना काजोलला तिच्या सिनेमाकरता हिरो सापडला आहे. काजोलच्या 'त्रिभंग' सिनेमाकरता एका मराठमोळ्या अभिनेत्याची निवड केली आहे. 'हेलिकॉप्टर ईला' नंतर काजोलच्या 'त्रिभंग' या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. महत्वाचं म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन अभिनेत्री रेणुका शहाणे करत आहे.
'त्रिभंग' हा सिनेमा नेटीफ्लिक्सवर रिलीज होणारा सिनेमा असून यामध्ये काजोलसोबत तनवी आजमी, मिथिला पालकर आणि कुणाल रॉय कपूर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर यामध्ये अपोझिट रोलकरता काजोलने अभिनेता वैभव तत्ववादीची निवड केली आहे.
वैभव तत्ववादीने सुपरहिट सिनेमा 'बाजीराव मस्तानी' मध्ये बाजीरावच्या लहान भावाची चिमाजी अप्पाची भूमिका सादर केली होती. 'त्रिभंग' सिनेमातील वैभव साकारत असलेलं पात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवलं आहे. महत्वाचं म्हणजे सिनेमाच्या प्रदर्शनापर्यंत वैभवच्या भूमिकेबद्दल कोणतीच गोष्ट समोर येणार नाही याची दक्षता सिनेमाच्या टीमने घेतली आहे.
वैभवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याचा फोटो शेअर केला आहे. नागपूरच्या वैभवने महेश मांजरेकरांच्या 'सुराज्य' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 'हंटर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. यानंतर वैभवने अनेक सिनेमांमध्ये लक्षवेधी काम केलं आहे.