ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम काळाच्या पडद्याआड

अखेर काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली... 

Updated: Sep 25, 2020, 02:24 PM IST
ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम काळाच्या पडद्याआड  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भारतीय संगीत विश्वात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी शुक्रवारी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र एस.पी. चरण यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली.

चेन्नईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती सुधारली होती. पण, अखेर काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आणि अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. 

जवळपास ४० हजारहून अधिक गीतं गाणाऱ्या एसपीबी यांनी संगीत विश्वात एक मैलाचा दगड प्रस्थापित केला होता. नव्वदचं दशक त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नावावर केलं होतं. जवळपास १६ भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली होती. कमल हासन आणि सलमान खान या अभिनेत्यांसाठी त्यांचा आवाज प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला. 

 

१९६६ मध्ये एसपीबी यांनी तेलुगू चित्रपट 'श्री श्री श्री मर्यादा रामन्ना' या चित्रपटातून त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. एमएसवी आणि इलियाराजा यांच्यासोबत काम करताना ऐंशीचं दशकही त्यांनी खऱ्या अर्थानं गाजवलं होतं. १९८१ मध्ये त्यांनी एका दिवसात तब्बल २१ गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांचा हा विक्रम आजतागायत कोणीही मोडलेला नाही. 

गायनाप्रमाणेच एसपीबी हे त्यांच्या अभिनयासाठीसुद्धा ओळखले गेले. Manathil Uruthi Vendum, Thiruda Thiruda, Kadhalan, Minsara Kanavu यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. कमल हासन, रजनीकांत, मोहनलाल, अनिल कपूर, बालकृष्ण या अभिनेत्यांसाठी त्यांनी व़्हॉईस ऍक्टर म्हणूनही जबाबदारी निभावली होती.