'स्किट झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या जजमेंटचा...', 'हास्यजत्रा' सोडण्यावर विशाखा सुभेदारनं सोडलं मौन

Vishaka Subhedar on maharshtrachi hasyajatra : विशाखा सुभेदारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं कारण सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 16, 2023, 06:26 PM IST
'स्किट झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या जजमेंटचा...', 'हास्यजत्रा' सोडण्यावर विशाखा सुभेदारनं सोडलं मौन title=
(Photo Credit : Social Media)

Vishaka Subhedar on maharshtrachi hasyajatra : ‘फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा अनेक कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी कॉमेडीयन म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम जेव्हा सोडला तेव्हा तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. विशाखानं कार्यक्रमाला रामराम का केला? त्या मागचं कारण काय? अशा अनेक चर्चा सुरु होत्या. विशाखानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या कार्यक्रमाला रामराम करण्याचे कारण सांगितले आहे. त्यासोबत या कार्यक्रमात काम करण्याचा अनुभव कसा होता हे देखील तिनं सांगितलं आहे. 

विशाखानं नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत हास्यजत्रेत काम करण्याचा अनुभव आणि त्यासोबतच कार्यक्रमातून काढता पाय का घेतला त्याविषयी सांगितले आहे. 'प्रेक्षकांचं माझ्यावर जितकं प्रेम आहे, जितक्या हक्कानं ते मला माझं काम आवडलं हे सांगतात तितक्याच हक्कानं तू का हा कार्यक्रम सोडलास? आम्हाला तुझा हा निर्णय आवडला नाही हे म्हणण्याचाही त्यांना हक्क आहे. आम्हाला जसं त्यांचं प्रेम हवं असतं तसं त्यांचा हा रागही आम्ही स्वीकारला पाहिजे. पण दरवेळी मला जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा मी उत्तर देते. खरंतर, मला कंटाळ आला होता. मी तेरा वर्षं स्किट फॉरमॅट करत आले आहे. त्यामुळे मला स्वतःला काहीतरी वेगळं करायचं होतं. स्किट झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या जजमेंटचा की आज चांगलं झालं, आज तू आणखीन चांगलं करू शकत होतीस… मला दरवेळी स्वतःला परीक्षेत उतरवायचा कंटाळ आला होता. आपलं काम आपल्याला छान वाटलं पाहिजे. माझ्या कामाचं परीक्षण दुसऱ्यांनी केल्यामुळे मला माझ्या कामाच्या समाधानाची पुडी बांधता येत नव्हती. मी माझा एव्हरेस्ट चढले आहे आणि मी खूप आनंदी आहे की माझ्या एव्हरेस्टवर मी झेंडा रोवला आहे. त्यामुळे मी आधी जिथे होते तिथे मी खुश होते आणि आता जिथे आहे तिथेही खूप खुश आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रेग्नंसी फोटो शूट करणारी स्वरा भास्कर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

पुढे याविषयी आणखी सविस्तर सांगत विशाखा म्हणाली की 'मी हास्यचत्रा सोडण्याचं तेच मुख्य कारण होतं. त्यात कोणी माझा अपमान करत आहे, मला योग्य वागणूक देत नाहीये अशातला काहीही भाग नाही. हास्यजत्रेत माझे खूप लाड झाले, मला फटकारलंही गेलं, मला टोमणेही खावे लागले. जे प्रत्येक कलाकाराला खावे लागतात. जर कलाकाराचं काम चांगलं झालं नाही तर त्याला बोलणी खावी लागतात आणि जर चांगलं झालं तर त्याची स्तुती ही होतेच. त्याचे आम्ही भुकेले असतो. जर मी उद्या एखादं वाईट काम करत असेन आणि मला जर लोकांनी ते सांगितलं नाही तर याचा अर्थ लोक माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कलाकाराला दुर्लक्षित केलं जाणं हे त्याच्यासाठी खूप वाईट असतं. मी आनंदी आहे की माझी अशी परिस्थिती नाही. मी हास्यजत्रा म्हणूनच सोडलं कारण मी कुठे आहे हे मला तपासून पाहायचं होतं.'