सैफची लेक आजीसोबत रेड कार्पेटवर येते तेव्हा....

आजी आणि नातीने जिंकलं सर्वांचं मन... 

Updated: Sep 26, 2019, 05:53 PM IST
सैफची लेक आजीसोबत रेड कार्पेटवर येते तेव्हा....
सैफची लेक आजीसोबत रेड कार्पेटवर येते तेव्हा....

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये सेलिब्रिटींची उल्लेखनीय उपस्थिती पाहायला मिळाली आहे. त्यातच आता  कलाविश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे वोग ब्युटी अवॉर्ड्सची. नुकतंच या पुरस्कार सोहळ्याच्या दहाव्या वर्षातील सोहळा पार पडला. 

मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्याला बऱ्याच सेलिब्रिटींची हजेरी पाहायला मिळाली. यातच विशेष लक्ष वेधलं ते म्हणजे सैफ अली खानची लेक आणि 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान हिची. 

सारा या पुरस्कार सोहळ्यात आली आणि साऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या सोहळ्यासाठी ती तिच्या आजीसोबत म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री शर्निला टागोर यांच्यासोबत आली होती. यावेळी तिने आजीसोबत अशा एखाद्या सोहळ्याला येण्याचा आनंदही व्यक्त केला. हिंदी कलाविश्वात आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या शर्मिला टागोर यांना 'बडी अम्मा' म्हणत आपल्यासाठी त्याच सौंदर्याचं प्रमाण होत्या, असं सारा म्हणाली. 

आजीसोबत या पुरस्कार सोहळ्यात येणं ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बाब आहे, असं सारा म्हणाली. या सोहळ्यासाठी सारा काळ्या रंगाच्या सुरेख जाळीदार गाऊनमध्ये आली होती. तर, शर्मिला टागोर या ऑफ व्हाईट रंगाच्या साडीमध्ये या सोहळ्यासाठी आल्या होत्या. यावेळी आजी आणि नातीची ही जोडी सर्वांची मनं जिंकून गेली. 

गेल्या काही दिवसांपासून सारा कलाविश्वात चांगलीच प्रकाशझोतात आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात तिला 'केदारनाथ' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) हा पुरस्कार देण्यात आला. फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या साराने तिचा चाहतावर्गही निर्माण केला आहे.