Keerthy Suresh on wearing turmeric thread: अभिनेत्री किर्ती सुरेशने दक्षिणात्य चित्रपटांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्याचा 'बेबी जॉन' चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळेही चाहत्यांमध्ये ती अत्यंत चर्चेत आली आहे. या चित्रपटात किर्तीने वरुण धवनसह स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाने जरी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली नसली तरी या चित्रपटातील किर्तीने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळत आहे. यासोबतच तिच्या अभिनयाला सुद्धा लोकांकडून प्रचंड चांगला प्रतिसाद आणि दाद मिळत आहे.
चित्रपटासोबतच तिच्या वैयक्तिक बाबींमुळेसुद्धा लोकांमध्ये चर्चा रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. किर्ती बऱ्याच वर्षांपासून प्रसिद्ध व्यावसायिक एंटनी थाटिल सोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि काही दिवसांपूर्वी म्हणजेच 12 डिसेंबर 2024 ला एंटनीसोबत गोव्यामध्ये ती विवाहबंधनात अडकली.
लग्नानंतर लगेचच, ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावू लागली होती. प्रमोशनदरम्यान तिने बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमांत किर्तीच्या गळ्यात मंगळसूत्राच्या ऐवजी हळदीचा धागा असल्याचं दिसून आलं. या धाग्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याला थाली किंवा मांगल्यम म्हटलं जातं.
नुकतंच किर्तीने एका मुलाखतीत हा हळदीचा धागा आपल्या गळ्यात असण्यामागचं कारण सांगितलं. "हा हळदीचा धागा शुभ आणि पवित्र मानला जातो. त्यामुळे या धाग्याला लगेच नाही काढू शकत. काही काळ हा धागा गळ्यात घालावा लागतो." असं ती म्हणाली. तसंच हा धागा काढल्यानंतर त्याऐवजी आपण सोन्याची चैन घालणार असल्याचं किर्तीने सांगितलं. यासोबतच हा धागा जानेवारीच्या अखेरपर्यंत घालून नंतर एका शुभ दिवशी काढणार असल्याचंही ती म्हणाली.
किर्तीने एंटनीसोबत हिंदू आणि ख्रिस्त अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. पहिल्यांदा गोव्यामध्ये किर्तीचं दक्षिणात्य पद्धतीने लग्न झालं आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीनंही त्यांनी सहजीवनाची वचनं एकमेकांना दिली. यावेळी बऱ्याचजणांनी हा धागा लपवून ठेवण्याचा सल्ला दिला परंतु मी हा धागा खूपच छान दिसतो त्यामुळं कायम गळ्यात ठेवते आणि त्याविषयी मला काही गैर वाटत नाही, असं म्हणत आपली भूमिका मांडली.
किर्तीच्या चित्रपटाविषयी सांगावं तर, 'बेबी जॉन' या चित्रपटासंदर्भात कालीस यांच्या दिग्दर्शनात हा सिनेमा साकारण्यात आला आहे. ख्रिसमसच्या निमित्तानं तो प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ, राजपाल यादव आणि सलमान खान यांनीसुद्धा भूमिका साकारल्या आहेत. 'बेबी जॉन'चे प्रोडक्शन प्रिया एटली, मुराद खेतानी आणि जिओ स्टूडिओज यांनी केलं आहे.